टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी बाबर आझम स्वतःच्याच हाताने स्वतःचे नुकसान करून घेत आहे. खराब फॉर्म बाबरची पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीये. बिग बॅश लीगमध्ये पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराची खराब कामगिरी सातत्याने सुरूच आहे. पर्थ स्कॉचर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात बाबरला साधे खातेही उघडता आले नाही. अवघ्या दुसऱ्याच चेंडूवर बाबरची खेळी संपुष्टात आली.
ही केवळ एका सामन्याची गोष्ट नाही, तर संपूर्ण सीझनमध्ये बाबरची अशीच बिकट अवस्था पाहायला मिळाली आहे. जरी बाबरचा पाकिस्तानच्या तात्पुरत्या (Provisional) संघात समावेश करण्यात आला असला, तरी या फॉर्मच्या जोरावर बाबर वर्ल्ड कप संघासाठी निवडकर्त्यांचा विश्वास जिंकू शकेल की नाही, हे सांगणे कठीण आहे.
टी20 वर्ल्ड कपच्या संघात बाबर आझमला जागा मिळणे आता कठीण वाटू लागले आहे. ही गोष्ट आम्ही उगाच बोलत नाही आहोत, तर बिग बॅश लीग मधील त्याचा अलीकडचा फॉर्म हेच स्पष्ट करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत बाबरने आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले आहेत.
या काळात त्याच्या बॅटमधून 22 च्या सरासरीने आणि 103 च्या स्ट्राइक रेटने अवघ्या 202 धावा निघाल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेत बाबरच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतके झळकली आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट तर प्रत्येक सामन्यात चर्चेचा विषय ठरला आहे. ही दोन अर्धशतके सोडली, तर उर्वरित खेळींमध्ये पाकिस्तानचा हा माजी कर्णधार एकदाही 30 धावांचा टप्पा ओलांडू शकलेला नाही.
बाबरची स्थिती इतकी खराब आहे की, 11 डावांपैकी 7 वेळा तो दुहेरी आकडाही गाठू शकलेला नाही. आता या आकडेवारीच्या आधारावर बाबर टी20 वर्ल्ड कप 2026 साठी निवडकर्त्यांचा विश्वास जिंकू शकेल, हे फार कठीण दिसते. 2025 मध्ये बाबरने पाकिस्तानकडून खेळलेल्या 8 सामन्यांमध्येही त्याचा स्ट्राइक रेट केवळ 114 चा होता. रिझवानला गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानच्या टी20 संघात जागा मिळालेली नाही आणि आता बाबरसाठीही क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटचे रस्ते पूर्णपणे बंद होताना दिसत आहेत






