यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघाने आपल्या सुरुवातीच्या ३ सामन्यात विजय मिळवत जवळ जवळ उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले आहे. पाकिस्तान संघाचे पुढील सामने नामिबिया आणि स्कॉटलॅंड संघासोबत होणार आहेत. त्यामुळे हा संघ सर्वोच्च स्थानी राहून उपांत्यफेरी गाठणार यात काही शंका नाही.
या स्पर्धेत पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने अप्रतिम नेतृत्व कामगिरी केली आहे. यासह उल्लेखनीय फलंदाजी देखील केली आहे, ज्यामुळे पाकिस्तान संघाला चांगली कामगिरी करण्यात यश आले आहे. याच बाबर आजमच्या वडिलांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्यावेळी २४ ऑक्टोबर रोजी भारत- पाकिस्तान सामना पार पडला. त्यादिवशी बाबर आजमची आई व्हेंटिलेटरवर होती. इतकेच नव्हे तर त्याची आई आपल्या आयुष्याशी झुंज देत होती. त्यामुळे तो पहिल्या तीन सामन्यात दबावात होता, असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे.
आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर करत बाबर आजमच्या वडिल आजम सिद्दीकींनी लिहिले की, “मला वाटते की माझ्या देशवासीयांनी काही सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे. सुरुवातीच्या ३ सामन्यात विजय मिळवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. यादरम्यान आमच्या घरात देखील एक मोठी परीक्षा सुरू होती. ज्यादिवशी भारत – पाकिस्तान सामना रंगला. त्यादिवशी बाबरची आई व्हेंटिलेटरवर होती. बाबर या तीनही सामन्यात दबावात होता.
आजम सिद्दीकी यांनी ही पोस्ट शेअर करताच ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आपल्या कुटुंबात इतकं सर्व सुरू असताना देखील बाबर आजमने याचा परिणाम आपल्या खेळावर जाणवू दिला नाही. त्याने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात अर्धशतक झळकावले. तर अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील सामना जिंकुन दिला.
https://www.instagram.com/p/CVpVRqBvjcA/?utm_medium=copy_link
पाकिस्तान संघाचा भारतीय संघावर विजय
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ५७ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ३९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने नाबाद ७९ आणि बाबर आजमने नाबाद ६८ धावा करत पाकिस्तान संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
कधी, कुठे आणि कसा पाहाल टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
वरिष्ठ गट महिलांच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी आझम कॅम्पस मैदान सज्ज






