शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. बाळासाहेबांचा राजकारण हा विषय जेवढा आवडीचा तेवढंच त्यांचे क्रिकेटरील प्रेमही महत्त्वाचे. बाठासाहेब तरुणाईत असताना, एका भारतीय क्रिकेटपटूच्या प्रतिभेने त्यांच्या मनावर भुरळ पाडली होती.
१९५० च्या दशकातील ही गोष्ट आहे, तेव्हा मुंबईतील शिवाजी पार्कवर बापू नाडकर्णी, मधुसूदन पाटील, रमाकांत देसाई यासारखे मुंबई क्रिकेटमधील दिग्गज सामने खेळत अथवा सराव करत. तेव्हा एक तरुण चाहता दुसऱ्या तरुण खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी नेहमी शिवाजी पार्कवर येत. तो क्रिकेटचा चाहता तरुण म्हणजे ‘बाळ ठाकरे’, जे भारताच्या इतिहासात ‘बाळासाहेब ठाकरे’ या नावाने अजरामर आहेत. अन् तो खेळाडू तरुण म्हणजे मुंबई व भारताचे यष्टिरक्षक फलंदाज ‘माधव मंत्री’.
चला तर जाणून घेऊया, त्या क्रिकेटपटूविषयी ज्याने अक्षरक्ष: बाळासाहेबांना आपला खेळ पाहण्याची ओढ लावली होती…
मंत्री एक यष्टीरक्षक व सलामीवीर फलंदाज होते. मुंबई क्रिकेट वर्तुळात नाव कमावल्यानंतर १९४८-४९ रणजी ट्रॉफीमध्ये त्यांची फलंदाजी नव्या उंचीवर पोहोचली. सलग तीन सामन्यात त्यांनी बंगालविरुद्ध ईडन गार्डन्सवर ११७, चेपॉक येथे मद्रास विरुद्ध (उपांत्यपूर्व फेरीत) ११६, तर पुणे येथे (उपांत्य फेरीत) महाराष्ट्राविरुद्ध २०० धावा केल्या. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील अंतिम सामन्यात ते ७० आणि ३० धावा करू शकले. त्या रणजी हंगामात मुंबईने विजेतेपद पटकावले.
१९५२ चा इंग्लंड दौऱ्यावर भारताला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी, डॉन ब्रॅडमन यांना अनेकदा चकवणारे डग राईट गोलंदाजी करत होते. तेव्हा मंत्री यांनी राइट यांना पुढे सरसावत षटकार ठोकला. तो षटकार प्रेक्षकांत गेला. त्यांनी मारला षटकार ब्रिटनच्या आयुक्तांनी झेलला होता.
माजी भारतीय खेळाडू विनू मंकड यांनी मंत्री यांचे टोपणनाव “जॉर्ज” असे ठेवले होते. इंग्लंडचे महान यष्टीरक्षक जॉर्ज डकवर्थ यांच्यासारखे यष्टीरक्षण मंत्री करतात असे मंकड यांना वाटत.
१९५४-५५ मध्ये पाकिस्तानच्या भूमीवर झालेल्या पहिल्या कसोटीत त्यांनी पंचांना टोमणे मारल्याची घटना क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध आहे. भारताचे दिग्गज फिरकीपटू सुभाष गुप्ते हे गोलंदाजी करत असताना पंच असलेल्या इद्रीस बेग यांनी एक नोबॉल दिला होता. तेव्हा, मंत्री बेग यांच्या जवळ जाऊन म्हटले, ” तुम्हाला कदाचित विस्डेनमध्ये नाव नोंदवून घ्यायचे आहे वाटतं. सुभाष कधीही नोबॉल टाकत नाही. ”
यष्ट्यांच्या दोन्ही बाजूंना मंत्री यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. ३३.८६ च्या सरासरीने ४,४०३ प्रथमश्रेणी धावा करताना, यष्टीरक्षक म्हणून १९२ गडी त्यांनी बाद केले. दुर्दैवाने, प्रबीर सेन आणि नरेन ताम्हाणे यांच्या आव्हानामुळे मंत्री केवळ चार आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळू शकले.
मंत्री हे सुनील गावसकर यांचे मामा तर गुंडाप्पा विश्वनाथ यांचे नात्याने काका लागत. सुनील गावसकर आपल्या ‘सनी डेज’ या पुस्तकात लिहितात, ” एकदा लहान असताना मी मामांकडे गेलो होतो. मामा त्यावेळी नुकतेच क्रिकेटपासून खेळाडू म्हणून बाजूला झाले होते. त्या ठिकाणी त्यांची मुंबई संघासाठीची तसेच भारतीय संघाकडून खेळलेली टोपी होती. मी त्यांना ती टोपी हवी आहे असे म्हटले. तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार देत सांगितले, सुनील या टोप्या भेट दिल्या जात नाहीत, तर कमवायच्या असतात.”
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मंत्री दादर क्रिकेट युनियनचे काम पाहू लागले. दिलीप वेंगसरकर व संजय मांजरेकर यांसारख्या खेळाडूंना शोधण्याचे श्रेय मंत्री यांना जाते. १९९० च्या इंग्लंड दौऱ्यावेळी ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. या दौर्यात सचिन तेंडुलकरला त्यांनी अधिक संधी दिली होती. याव्यतिरिक्त ते भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष तसेच बीसीसीआयचे खजिनदार राहिले.
२०१४ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा ते ९२ वर्ष २६४ दिवसांचे होते. मृत्यूवेळी ते भारताचे सर्वात वयस्कर हयात असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…
बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत
“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा