क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. या खेळात कधी काय होईल?, याचा अंदाज लावता येत नाही. बऱ्याचदा चालू क्रिकेट सामन्यादरम्यान अनेक विचित्र घटनाही घडताना दिसतात. अशीच काहीशी घटना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (NZ vs BAN) यांच्यातील आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC Women ODI World Cup 2022) दरम्यान घडली. सोमवारी (०७ मार्च) डुनेडिनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली, ज्यामुळे फलंदाजाला जीवनदान मिळाले.
त्याचे झाले असे की, न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विश्वचषक सामना सुरू असताना न्यूझीलंडची यष्टीरक्षक केटी मार्टिन (Katey Martin) हिच्या ग्लोव्ह्जमध्ये चेंडू चिकटला (Ball Stuck In Wicketkeepers Gloves), ज्यामुळे बांगलादेशची फलंदाज धावबाद होण्यापासून वाचली.
हा प्रसंग बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना फ्रांसिस मॅकेच्या डावातील २६ व्या षटकादरम्यान घडला. त्यावेळी मैदानावर बांगलादेशच्या लता मंडळ आणि जहांआरा आलम फलंदाजी करत होत्या. या षटकातील शेवटच्या चेंडूवर लता मंडळने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू तिच्या बॅटची कडा घेत थर्डमॅनच्या दिशेने गेला. यानंतर त्वरित लता मंडळ आणि जहाआरा आलम धाव घेण्यासाठी पळाल्या आणि त्यांनी ३ धावाही पूर्ण केल्या.
सुरुवातीच्या २ धावा पूर्ण करण्यात त्यांना कसलीही अडचण आली नाही. मात्र शेवटची तिसरा धाव पूर्ण करण्यासाठी त्यांना नशिबाची साथ मिलाली. कारण तिसऱ्या धावेसाठी त्या दोघी पळत असताना न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडून तो यष्टीरक्षक केटी मार्टिनकडे टाकला होता. केटीने चेंडू अचूक पकडलाही होता. त्यावेळी जहाआरा क्रिजपासून बरीच दूरही होती. केटीने तिला धावबाद करण्यासाठी चेंडू यष्टीला मारला. मात्र चेंडू तिच्या ग्लोव्ह्जमध्येच अडकून बसल्यामुळे तो यष्टीला लागू शकला नाही आणि जहाआराला जीवनदान मिळाले.
https://www.instagram.com/reel/CayeOR7oMUe/?utm_source=ig_web_copy_link
मजेची बाब म्हणजे, तो चेंडू केटीच्या ग्लोव्ह्जमध्ये असा काही चिटकला होता की, त्याला काढण्यासाठी केटीला ग्लोव्ह्ज हातातून काढावे लागले आणि त्यावर मारून चेंडू खाली पाडावा लागला. हा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला असून व्हिडिओ क्रिकेट चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय.
महत्त्वाच्या बातम्या-
आख्खं जग करतंय जडेजाचं कौतुक; पण भारताच्या ‘या’ माजी दिग्गजाला वाटतंय दु:ख, पण का?
टीम इंडियात ‘हा’ २४ वर्षीय खेळाडू लवकरच करू शकतो एन्ट्री; दीडशेच्या सरासरीने ठोकल्यात १४७१ धावा