पुणे : विजेतेपदाच्या दावेदार असलेल्या अग्रमानांकित नैशा रेवसकर व द्वितीय मानांकित रुचिता दारवटकर यांनी सहज विजय मिळविला आणि बालुफ ऑटोमेशन चषक टेबल टेनिस स्पर्धेतील मुलींच्या पंधरा वर्षाखालील गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली.
बालुफ ऑटोमेशन व शारदा स्पोर्ट्स सेंटर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली ही स्पर्धा शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आणि बालुफ ऑटोमेशन कंपनीने पुरस्कृत केली आहे.
नैशा हिने काउंटर ॲटॅक पद्धतीचा बहारदार खेळ करीत आद्या गवात्रे हिला ११-८, ११-४,११-३ असे निष्प्रभ केले. रुचिता हिने वेदांगी जुमडे हिचा ११-९,११-२,११-७ असा सरळ तीन गेम्स मध्ये पराभव केला. तिने टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला. तृतीय मानांकित तनया अभ्यंकर व चौथी मानांकित सई कुलकर्णी यांनीही अपराजित्व राखले. तनया हिने गौरी वणीकर हिच्यावर ११-६,११-३,११-५ अशी एकतर्फी मात केली. सई हिने आरूषी शेटे हिचे आव्हान ११-०,११-१,११-९ असे संपुष्टात आणले.
या सामन्यांच्या तुलनेत इशिता इंदापूरकर हिला उपांत्यपूर्व फेरी गाठताना संघर्ष करावा लागला. तिने सारा गांधी हिचा ९-११,११-१३, ११-९, ११-३,११-७ असा पराभव केला. तिने पहिल्या दोन गेम्स गमावल्यानंतर अष्टपैलू खेळ करीत विजयश्री खेचून आणली. पलक जैसवानी हिने श्रेया गायकवाड हिला ६-११,११-५,११-४,११-८ असे पराभूत केले आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. नभा किरकोळे हिने मृदुला सुरवसे हिचा ११-७, ११-४,११-८ असा पराभव केला. नीरजा देशमुख हिने देखील विजयी वाटचाल कायम राखली. तिने अद्विका भोसले हिला ११-६, ११-७, १२-१० असे पराभूत केले. (Baluf Automation Cup Table Tennis Tournament. Naisha Revaskar and Ruchita Darwatkar entered the quarter-finals)
महत्वाच्या बातम्या –
चेस वर्ल्डकप । भारताच्या आर प्रत्रानंदाची अंतिम सामन्यात धडक! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय
राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 मध्ये सेतुरामन एसपी आघाडीवर