नुकतेच श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. घरच्या मैदानावर झालेल्या या कसोटी मालिकेत बांगलादेशला १-०ने पराभूत व्हावे लागले. तर पहिला सामना अनिर्णित राहिला. मीरपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्यांना श्रीलंकेकडून १० विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. हे झाले असताच बांगलादेशला अजून एक धक्का बसला.
या पराभवाने निराश होऊन मोमिनूल हक (Mominul Haque) याने बांगलादेश कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा त्याग केला आहे. त्याने २०१९- २०२२ दरम्यान संघाचे १७ कसोटी सामन्यांत नेतृत्त्व केले आहे. यामध्ये १२ सामन्यांत संघ पराभूत झाला असून २ सामने अनिर्णीत तर तीनच सामने जिंकले.
“जेव्हा आपण उत्तमरित्या खेळत असतो आणि संघ जिंकत नाही, तेव्हा आपण संघाला प्रेरित करतो. पण जेव्हा मी धावा बनवण्यात अयशस्वी होत आहे आणि संघाची कामगिरीही खराब होत आहे. अशा स्थितीत संघाचे नेतृत्व करणे मला कठीण जात आहे“, असे मोमिनूलने इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हटले आहे.
“मला क्रिकेट बोर्डाने संघाचे नेतृत्व करायला लावले. पण ते मला जमले नाही आणि मला फलंदाजीवरच लक्ष केंद्रित करायचे आहे”, असेही मोमिनूल पुढे म्हणाला.
संघाचे कर्णधारपद सांभाळताना मोमिनूल फलंदाजीत संघर्ष करताना दिसला. त्याची फलंदाज आणि कर्णधार-फलंदाज यांच्यातील सरासरीची तुलना केली असता त्यात एकदम १० चा फरक दिसला. त्याने यावर्षी १६.२०च्या सरासरीने १६२ धावाच केल्या. तर त्याने एकूण कारकिर्दीत ५२ कसोटी सामने खेळताना ३८.३१च्या सरासरीने ३५२५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ११ शतकांचा समावेश आहे.
बांगलादेशने यावर्षी न्यूझीलंडच्या माऊंट मोनेगुईच्या बे ओव्हलवर ८ विकेट्सने विजय मिळवत इतिहास केला होता. नंतर मात्र संघाची कामगिरी खराब झाली. त्यांना पुढील पाच पैकी चार कसोटी सामन्यांत पराभव स्विकारावा लागला. कसोटी चॅम्पियनशीप २०२३च्या गुणतालिकेत बांगलादेशचा संघ आठव्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोकांनी तूला संपल्यात जमा केले होते, पण तू…’, आयपीएल जिंकल्यानंतर हार्दिकचं भाऊ कृणालकडून कौतुक