बांगलादेशचे क्रिकेटपटू आपल्या बेशिस्त वर्तनासाठी संपूर्ण क्रिकेट जगतात बदनाम आहेत. बांगलादेशचे वरिष्ठ तसेच कनिष्ठ खेळाडूही अनेकदा भर मैदानात वाद घालताना दिसून येतात. विरोधी संघातील खेळाडूंना डिवचण्यासाठी हे खेळाडू विचित्र हावभाव किंवा विवादित पद्धतीने जल्लोष साजरा करत असतात. बांगलादेशचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू मुशफीकूर रहीम हा नुकताच एका स्थानिक सामन्यात आपल्याच संघसहकाऱ्याशी वाद घालताना दिसून आला. या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
स्थानिक स्पर्धेत रहीम करत आहे संघाचे नेतृत्व
बांगलादेशचा माजी कर्णधार असलेला रहीम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या बेशिस्त वर्तणुकीसाठी कुप्रसिद्ध आहे. सध्या ढाका येथे सुरू असलेल्या बंगबंधू टी२० कपमध्ये तो ढाका बेक्सीमको संघाचे नेतृत्व करत आहे. ढाका बेक्सीमको विरुद्ध फॉर्च्यून बरीसाल यांच्या दरम्यान झालेल्या एलिमिनेटर सामन्यात तो आपल्या संघातील युवा खेळाडूंवर संतप्त झालेला दिसला.
अशी होती घटना
सामन्याच्या दुसऱ्या डावातील १७ वे षटक प्रगतीपथावर होते. तेव्हा कर्णधार रहीम आपला साथीदार नसुम अहमदबरोबर एका झेलावरून झगडला. ही घटना घडली त्यावेळी बरीसाल संघाला विजयासाठी १९ चेंडूत ४५ धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे पाच गडी देखील शिल्लक होते. बरीसाल संघाचा आफिफ हुसेन त्याक्षणी चांगल्या लयीत खेळत होता.
षटकातील अखेरच्या चेंडूवर डावखुऱ्या हुसेनने चौकार खेचून घेण्याच्या इराद्याने फाईन लेगला चेंडू मारला. त्याचवेळी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक नसुम ३० यार्डाच्या आत असल्याने लेग स्लीपजवळ उभा होता. चेंडू वर उडाल्याने दोन्ही खेळाडू झेल घेण्यासाठी धावले. रहिमने आवाज देत तो झेल पकडणार असल्याचे सांगितले. तरीही नसुम जवळ आला. रहीमने तो झेल पूर्ण केला. मात्र त्यानंतर तो नसुमवर जाम संतापला. झेल घेतल्यानंतर रहीमने नसुमला चेंडूने मारण्यासाठी हात उगारला. त्यानंतरही, मैदानातील इतर खेळाडू त्याला बराच वेळ शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
Calm down, Rahim. Literally. What a chotu 🐯🔥
(📹 @imrickyb) pic.twitter.com/657O5eHzqn
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) December 14, 2020
ढाका संघाने जिंकला सामना
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रहीमच्या नेतृत्वाखालील ढाका संघाने २० षटकांत १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात बरीसालचा संघ १४१ धावा करू शकला. ढाका संघाकडून कर्णधार रहीमने ४३ तर यासिर अलीने ५४ धावांची उपयुक्त खेळी खेळली. अकबर अलीनेही ९ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले. आफिफ हुसेनने बरीसालसाठी दमदार अर्धशतक झळकावले पण तो बाद होताच सामना ढाका संघाकडे झुकला.
महत्वाच्या बातम्या:
– दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडची वेस्ट इंडिजवर मात, टेस्ट रँकिंगमध्ये पटकावला हा क्रमांक
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– या नियमामुळे गोलंदाज असहाय्य, माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने सांगितली समस्या