ऍडलेड येथे गुरुवारपासून (१७ डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापनाने कसोटी संघात काही बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज सीन ऍबॉट याला दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे, तर अष्टपैलू खेळाडू मोझेस हेन्रीक्स याला तब्बल ४ वर्षांनंतर संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध ऑगस्ट २०१६ मध्ये खेळला होता.
हेन्रीक्सला काही दिवसांपूर्वी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघात झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यातून त्याला बाहेर ठेवण्यात आले होते. परंतु सोमवारी (१४ डिसेंबर) फिटनेस टेस्ट पास झाल्याने तो कसोटी क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला आहे. तीन दिवसांमध्ये तो ऑस्ट्रेलिया संघासोबत ऍडलेडमध्ये दाखल होईल.
ऑस्ट्रेलियाचा ३३ वर्षीय फलंदाज हेन्रीक्स पहिल्या कसोटी सामन्यात विल पुकोव्हस्कीची जागा घेईल. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात झालेल्या पहिल्या सराव सामन्यात पुकोव्हस्की जखमी झाला होता. सामन्यादरम्यान कार्तिक त्यागीचा बाउंसर त्याच्या हेल्मेटला लागला होता. तसेच ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर हा देखील दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्कस हॅरिस याला संघात सहभागी करण्यात आले आहे. वॉर्नरला भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापत झाली होती.
पहिल्या कसोटी सामन्यासाठीचा ऑस्ट्रेलिया संघ-
टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोझेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशाने, नॅथन लायन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानात पुन्हा येणार ‘हिटमॅन’चं वादळ! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होणार आज रवाना
भारताकडून मयंकसोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग, माजी दिग्गजाचे मत