बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या बंगबंधू टी20 स्पर्धेदरम्यान १८ वर्षीय बांगलादेशी फलंदाज परवेज हुसेनने धावांची सुनामी आणली आहे. केवळ ४२ चेंडूंचा सामना करत त्याने आक्रमक शतक झळकावले आहे .
बंगबंधू टी २० स्पर्धेचा १५ वा सामना मिनिस्टर राजशाही आणि फॉर्चूयन बारिशल या संघात ढाका येथे पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजशाही संघाने २० षटकांत २२१ धावा बनवल्या. राजशाही संघाकडून नजमुल हसनने १०९ धावांची आक्रमक खेळी केली.
प्रतिउत्तरात बारिशल संघाचा कर्णधार तमीम इकबाल ५३ धावा करून बाद झाला. मात्र या नंतर परवेज हुसेनने मैदानात चौकार व षटकारांची आतषबाजी केली. परवेजने ९ चौकार व तब्बल ७ षटकार ठोकत केवळ ४२ चेंडूत नाबाद १०० धावा करत ५ चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी परवेजने केलेल्या या कामगिरीने क्रिकेट वर्तुळात त्याची वाहवा होत आहे.