एटीकेसमोर बेंगळूरु संघाचे आव्हान

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये रविवारी एटीके एफसीसमोर रविवारी उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्यात गतविजेत्या बेंगळूरु एफसी संघाचे आव्हान आहे. बेंगळूरुमध्ये पराभव झाल्याने घरच्या मैदानावर पुनरागमन करण्याचे आव्हान एटीकेसमोर आहे. अंतिम फेरीसाठी एटीके संघाला विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर दमदार खेळ करावा लागेल.

बेंगळूरु संघाने गेल्या आठवड्यात पहिल्या टप्यात 1-0 असा विजय संपादन केला. त्यांचे पारडे जड असले तरी फार वर्चस्व आहे अशी स्थिती नाही. एटीके संघाला बेंगळूरु संघाचा चिवट बचाव भेदावा लागेल. पहिल्या टप्प्यात जुआनन गोंझालेझ याच्याविरूद्ध रॉय कृष्णा, डेव्हिड विल्यम्स आणि एदू गर्सिया यांना फार मोकळीक मिळाली नाही.

बेंगळूरुविरूद्ध 19 सामन्यांत केवळ 13 गोल झाले आहेत. त्यामुळे आव्हान खडतर असले तरी आपला संघ बाजी मारू शकेल असा विश्वास प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांना असेल.

एटीकेची घरच्या मैदानावरील कामगिरी यंदा प्रभावी झाली आहे. नऊ पैकी सहा सामने त्यांनी जिंकले आहेत. त्यांनी 33 पैकी 18 गोल येथे केले आहेत. साखळीत येथील लढत एटीकेने 1-0 अशी जिंकली होती.

बेंगळूरु प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी सांगितले की, आम्ही एका खडतर लढतीची अपेक्षा ठेवली आहे. गेल्या तीन मोसमांतील एटीकेसाठी हा सामना सर्वाधिक महत्त्वाचा आहे. गेल्या दोन मोसमांत त्यांना बाद फेरी गाठता आली नव्हती आणि आम्हाला सलग तिसऱ्या वेळी अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी करण्याची संधी आहे.

एटीके संघाला प्रबीर दास आणि मायकेल सुसैराज ह्या फुल-बॅक कडून सुसज्ज खेळाची अपेक्षा असेल. त्यांना कृष्णा आणि विल्यम्स यांना फारशी साथ देता आली नाही. बेंगळूरुमधील कसर ह्यावेळी भरून काढण्याची त्यांना अशा असेल. बेंगळुरूचा लेफ्ट-बॅक निशू कुमार ह्याला पहिल्या टप्प्यात मैदान सोडावे लागले. त्यामुळे त्या बाजूला प्रबीर बेंगळूरुसाठी डोकेदुखी ठरेल अशी शक्यता आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे एटीके संघाला बाचावात सावध राहावे लागेल. एक चूक जरी झाली तरी बेंगळूरु एक गोल करेल, जो आव्हान आणखी खडतर ठरवेल. पहिल्या टप्प्यात अरींदम भट्टाचार्य याच्या चुकीमुळे देशोर्न ब्राऊन याला संधी मिळाली आणि बेंगळूरु जास्त संधी निर्माण करू शकला नसताना सुद्धा खाते उघडू शकला.

हबास यांनी सांगितले की, सामना जिंकून अंतिम फेरी गाठणे हे आमचे ध्येय आहे. ते सध्या करण्यासाठी संघाची तयारी करून घेणे हे माझे कर्तव्य आहे. एटीकेसाठी हे एक मोठे आव्हान आहे. आम्ही सज्ज आहोत. गोल करणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच गोल होऊ न देणे आवश्यक आहे.

बेंगळूरु मात्र सुनील छेत्री आणि एरिक पार्टालू यांच्यामुळे विश्वासाने खेळेल. त्यांची गोल करण्याची क्षमता सर्वांना माहीत आहे. डीमास डेल्गाडो याचे कौशल्य एटीके संघासाठी धोकादायक ठरेल.

You might also like