---Advertisement---

गतविजेत्या बेंगळुरूची ओदीशावर मात

On: गुरूवार, जानेवारी 23, 2020 10:00 PM
---Advertisement---

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात गतविजेत्या बेंगळुरू एफसीने बाद फेरीच्या शर्यतीमधील प्रतिस्पर्धी ओदीशा एफसीला 3-0 असे हरविले.

श्री कांतीरवा स्टेडियमवर पहिल्या सत्रात तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करीत बेंगळुरूने वर्चस्व राखले. याबरोबरच बेंगळुरूने गुणतक्त्यात आघाडीही घेतली.

जमैकाचा 29 वर्षीय स्ट्रायकर देशोर्न ब्राऊन, भारताचा राहुल भेके यांनी पहिल्या सत्रात गोल केले. दुसऱ्या सत्रात कर्णधार सुनील छेत्रीने पेनल्टी सत्कारणी लावली.

आघाडी फळीत छेत्रीशिवाय इतरांना मिळालेला फॉर्म बेंगळुरूसाठी आश्वासक ठरला. छेत्रीने यंदाच्या मोसमातील नववा गोल केला.

त्याने गोल्डन बूटच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असलेल्या गोव्याचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याला गाठले. कोरोचे 13 सामन्यांतून 9 गोल आहेत.

स्पेनच्या कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूने 14 सामन्यांत सातवा विजय नोंदविला असून चार बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 25 गुण झाले.

बेंगळुरूने एटीके एफसी व एफसी गोवा यांना मागे टाकले. एटीके आणि गोवा यांचे प्रत्येकी 13 सामन्यांतून प्रत्येकी 24 गुण आहेत. एटीकेचा गोलफरक 13 (23-10), तर गोव्याचा 9 (25-6) असा आहे. बेंगळुरूचा गोलफरक 9 (18-9) असा आहे.

या पराभवामुळे ओदीशाच्या पहिल्या चार संघांमधील स्थान भक्कम करण्याचा आशांना धक्का बसला. त्यांना 14 सामन्यांत पाचवी हार पत्करावी लागली. 6 विजय आणि तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 21 गुण व चौथे स्थान कायम राहिले.

मुंबई सिटी एफसी (13 सामन्यांतून 19) आणि जमशेदपूर एफसी (12 सामन्यांतून 16) हे संघ अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर आहेत. सातव्या क्रमांकावरील चेन्नईयीन एफसीचे 12 सामन्यांतून 15 गुण आहेत.

23व्या मिनिटाला बेंगळुरूने सेट-पिसेसवरील हुकुमत प्रदर्शित केली. डिमास डेल्गाडोने घेतलेल्या फ्री-किकवर एरीक पार्टालूने उडी घेत हेडिंग केले. त्यावेळी चेंडू नेटमध्ये जाणार असे स्पष्ट दिसत होते, पण ब्राऊननेही अतिरीक्त प्रयत्न करीत फिनिशिंगला हातभार लावला.

दोन मिनिटांनी शॉर्ट कॉर्नरवर डेल्गाडोने उदांता सिंगला पास दिला. त्यातून पार्टालूने चेंडूवर नियंत्रण मिळवित चाल पुढे नेली. मग आपल्या दिशेने चेंडू येताच राहुलने सफाईदार फिनिशींग केले.

दुसऱ्या सत्रात 60व्या मिनिटाला ओदीशाचा अर्जेंटिनी मध्यरक्षक मार्टिन ग्युएडेसने पार्टालुला गोलक्षेत्रात पाडले. त्यामुळे ग्युएडेसला पिवळे कार्ड आणि बेंगळुरूला पेनल्टी बहाल करण्यात आली.

ती घेण्यासाठी छेत्री पुढे आला. त्याने नेटच्या वरच्या कोपऱ्यात चेंडू मारला. त्यामुळे ओदीशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग उजवीकडे झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---