सध्या बांगलादेश क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात असून, यजमान न्यूझीलंडने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली. आज (३० मार्च) झालेला दुसरा टी२० सामना न्यूझीलंडने जिंकला खरा मात्र या सामन्यात चांगलाच सावळा गोंधळ पाहायला मिळाला.
पावसामुळे सामन्यात व्यत्यय
नेपियर येथे झालेल्या या सामन्यात यजमान बांगलादेशने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ग्लेन फिलिप्सच्या नाबाद ५८ व डॅरिल मिचेलच्या नाबाद ३४ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने १७.५ षटकात ५ बाद १७३ धावा बनविल्या असताना पावसाला सुरुवात झाली. पाऊस लवकर न थांबल्याने पंचांनी न्यूझीलंडचा डाव तिथेच थांबविला.
…आणि बांगलादेश फलंदाजीसाठी मैदानात उतरली
पाऊस थांबल्यानंतर बांगलादेशचे सलामीवीर मोहम्मद नईम व लिटन दास हे मैदानात उतरले. बांगलादेशच्या फलंदाजांनी १.३ षटकात १२ धावा बनविल्या देखील होत्या. मात्र, त्यांना व गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला किती धावांचे लक्ष्य मिळाले आहे हेच माहीत नव्हते. खरंतर, पंचांनी याबाबत चर्चाच केली नव्हती.
त्यानंतर, पंचांनी सविस्तर चर्चा केली व बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार १६ षटकात १७० धावांचे आव्हान दिले.
बांगलादेशला आले अपयश
या सर्व प्रकारानंतर मिळालेले १७० धावांचे आव्हान पूर्ण करण्यात बांगलादेशला अपयश आले. सलामीवीर नईमने ३८ तर, अष्टपैलू सौम्य सरकारने २७ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त कोणीही मोठी धावसंख्या करू न शकल्याने त्यांचा डाव १६ षटकात १४२ पर्यंत मर्यादित राहिला. मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे न्यूझीलंडने ही मालिका खिशात घातली आहे.
महत्वाच्या बातम्या:
ना धोनी ना रोहित ना कोहली; हे आहेत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
आठवतंय का? आजच्याच दिवशी पाकिस्तानला चारीमुंड्या चित करत टीम इंडियाने गाठली होती विश्वचषकची फायनल