बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (४ ऑगस्ट) मिरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला गेला. यजमान बांगलादेशने सलग दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. बांगलादेशचा अष्टपैलू अफिफ हुसेन याला त्याच्या ३७ धावांच्या झुंजार खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बांगलादेशी गोलंदाजांचे दमदार प्रदर्शन
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर जोशुआ फिलीप व ऍलेक्स केरी सलग दुसऱ्या सामन्यात अयशस्वी ठरले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या पावर-प्लेमध्ये दोन गडी गमावत ३१ धावा बनविल्या.
त्यानंतर, मिचेल मार्श व मोईजेस हेन्रीकेज यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५७ धावा जोडून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मार्शने ४५ तर, हेन्रीकेजने ३० धावांचे योगदान दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करू शकला नाही व त्यांचा डाव ७ बाद १२१ धावांवर संपुष्टात आला. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक तीन बळी आपल्या नावे केले.
बांगलादेशी अष्टपैलूंचे महत्त्वपूर्ण योगदान
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १२२ धावांच्या आव्हानासमोर बांगलादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गोलंदाजांनी बांगलादेशचे पहिले पाच फलंदाज १२ षटकात ६७ धावांवर गमावले. ऑस्ट्रेलिया या सामन्यात पुनरागमन करणार असे वाटत असताना, नुरूल इस्लाम व अफिफ हुसेन या अष्टपैलू खेळाडूंनी ५६ धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला १९ व्या षटकात विजय मिळवून दिला.
पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना याच मैदानावर ६ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. हा सामना जिंकून बांगलादेश मालिका विजय साजरा करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा संघ या विजयासह मालिकेतील आपले आव्हान टिकवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल चाहर लेग स्पिनर बनण्यामागे दीपक चाहर आहे कारण; जाणून घ्या काय आहे ती रंजक कहाणी
‘पंतने सॅम करनचे गॉगल चोरले?’ रिषभच्या ‘त्या’ गॉगल्सचीच सगळीकडे चर्चा
केकेआरसाठी खुशखबर! ‘हा’ प्रमुख परदेशी खेळाडू उर्वरित आयपीएल २०२१ हंगामासाठी उपलब्ध