संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे सातव्या टी२० विश्वचषकातील पात्रता फेरीचे सामने खेळले जात आहेत. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ब गटातील दुसरा सामना यजमान ओमान व बांगलादेश यांच्या दरम्यान खेळला गेला. जवळपास ७५ टक्के सामना नियंत्रणात असताना फलंदाजांनी हाराकिरी केल्याने ओमानला या सामन्यात २६ धावांनी पराभूत व्हावे लागले. यासह ब गटातील समीकरणे गुंतागुंतीची झाली असून, गुरुवारी होणारे सामने निर्णायक ठरतील.
ओमानची धारदार गोलंदाजी
बांगलादेशचा कर्णधार मोहम्मदुल्ला याने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे दोन फलंदाज अवघ्या २१ धावांमध्ये तंबूत परतले. त्यानंतर सलामीवीर नईम व अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन यांनी तिसऱ्या गड्यासाठी ८० धावा जोडल्या. २९ चेंडूमध्ये ४३ धावा काढून शाकिब दुर्दैवी रित्या धावबाद झाला. नईमने ५० चेंडूमध्ये ६४ धावांचे योगदान दिले. परंतु, त्यानंतर मोहम्मदुल्ला वगळता कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. परिणामी, अखेरच्या चेंडूवर बांगलादेशचा डाव १५३ धावांवर संपुष्टात आला.
चांगल्या सुरुवातीनंतर ओमानची हाराकिरी
पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवलेल्या ओमानच्या संघाने १५४ धावांचा पाठलाग वेगाने सुरू केला. त्यांनी पहिल्या पावर प्लेमध्ये एक गडी गमावत ४८ धावा उभारल्या. कश्यप २१ धावा काढून परतल्यानंतर कर्णधार झिशान मकसूद व जतिंदर सिंग यांनी धावांचा वेग कायम राखला. मात्र, ११.२ षटकात मकसूद संघाच्या ८१ धावा झाल्या असताना बाद झाला व सामन्याचे चित्र पालटले. पाठोपाठ जतिंदर ४० धावांवर बाद झाला. त्यानंतर, मेहदी हसन शाकिब यांनी फिरकीचे जाळी विणत धावांना लगाम घातला. जोडीला मुस्तफिजुर रहमानने चार बळी घेत ओमानला ९ बाद १२७ धावांवर रोखले. सामन्यात ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी व तीन गडी बाद करणारा शाकिब सामन्याचा मानकरी ठरला.
सुपर १२ साठी वाढली चुरस
बांगलादेशच्या विजयामुळे गट ब मधील सुपर १२ मध्ये जाण्याची चुरस वाढली आहे. स्कॉटलंड दोन विजयांसह गुणतालिकेत अव्वल आहेत. त्यानंतर ओमान व बांगलादेश यांचे प्रत्येकी एका विजयासह दोन गुण असून, सरस धावगतीच्या जोरावर ओमान दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुरुवारी बांगलादेशने पापुआ न्यू गिनीवर मोठा विजय मिळवल्यास तेदेखील सुपर १२ साठी दावा ठोकू शकतात.






