भारत आणि बांगलादेश (India And Bangladesh) यांच्यातील कसोटी मालिका सुरुवात होण्यास अवघे काही तास उरले आहेत. त्यासाठी दोन्ही संघ घाम गाळत आहेत. पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर बांगलादेश संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला दिसत आहे. कर्णधार नजमुल हसन शांतोने (Najmul Hossain Shanto) पत्रकार परिषदेत बोलताना खळबळजनक वक्तव्य केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना शांतो म्हणाला, “मला वाटते आम्ही पाकिस्तानविरुद्ध खूप चांगले क्रिकेट खेळलो, ज्यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला. पण, ती भूतकाळातील गोष्ट आहे. आम्ही येथे नवीन मालिका खेळण्यासाठी आलो आहोत आणि आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळू शकतो असा विश्वास सर्व खेळाडूंना आहे. आम्ही निकालाचा विचार करत नाही, तर आमच्या कार्यपद्धतीचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
पुढे बोलताना शांतो म्हणाला, “मला वाटते की भारत खूप चांगला संघ आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. पण, आम्ही परिस्थिती आणि विरोधकांचा विचार करत नाही. आपण फक्त आपलाच विचार करत असतो.”
चेन्नईच्या खेळपट्टी आणि संघाबाबत बोलताना शांतो म्हणाला, “मला वाटते की आमच्याकडे खूप अनुभवी फिरकी गोलंदाजी आक्रमण आहे. पण मला वाटते, गेल्या काही वर्षांत आपल्याकडे खूप चांगले वेगवान गोलंदाजही आले आहेत. मला माहित आहे की, ते इतके अनुभवी नाहीत. परंतु ते गोलंदाजी करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे मी फिरकी किंवा वेगवान गोलंदाजीचा फारसा विचार करत नाही. विकेटचा विचार केला तर ती चांगली विकेट असेल. मला याबद्दल जास्त बोलायचे नाही. आम्ही शक्य तितक्या लवकर विकेटशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: विराट-शाकिबमध्ये होणार जंगी लढत, जाणून घ्या सामन्यापूर्वी टॉप-5 खेळाडूंची लढाई
IND vs BAN: पहिल्या सामन्यात संधी कोणाला पंत की जुरेल? प्रशिक्षकाने थेटच सांगितले
‘या’ 3 स्टार महिला क्रिकेटर आपल्या सौंदर्याने सोशल मीडियावर खूप लोकप्रिय!