श्रीलंकेमध्ये पुढील आठवड्यापासून टी २० तिरंगी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत श्रीलंकेसह बांगलादेश आणि भारताचा संघ सामील होणार आहे.
या मालिकेचे नाव निदाहास ट्रॉफी असून ही स्पर्धा सुरु होण्याआधीच बांग्लादेशला एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा नियमित कर्णधार शाकिब अल हसनला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागणार आहे.
शाकिबला जानेवारी महिन्यात तिरंगी वनडे मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना बोटाची दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अजूनही सावरला नसल्याने त्याला ६ मार्च पासून सुरु होणाऱ्या निदाहास ट्रॉफीमध्ये खेळता येणार नाही.
तसेच शाकिबला मागील महिन्यात पार पडलेले श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामने आणि २ टी २० सामान्यांनाही मुकावे लागले होते. परंतु शाकिब निदाहास ट्रॉफीपर्यंत बरा होईल अशा अपेक्षेने त्याचा या मालिकेसाठी बांग्लादेशच्या संघात समावेश करण्यात आला होता.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने शाकिबला दुखापतीवर उपचार करण्यासाठी थायलंडला पाठवले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याला ही दुखापत बरी होण्यासाठी आणखी वेळ लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे आता बांग्लादेश संघाचे नेतृत्व उपकर्णधार महमुदुल्लाह रियाद करेल.
शाकिबच्या ऐवजी लिटोन दासला बांग्लादेश संघात संधी देण्यात आली आहे. ही मालिका ६ मार्च ते १८ मार्च दरम्यान होणार आहे.