बांगलादेशातील सत्तापालटाच्या स्थितीचा क्रिकेटवरही परिणाम दिसून येत आहे. अशा परिस्थितीत 2024 मध्ये होणारा महिला टी20 विश्वचषकही दुसऱ्या देशात हलवला जाऊ शकतो, असे मानले जातेय. दुसरीकडे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी बांगलादेश क्रिकेटमध्ये राजीनाम्यांची फैरी सुरूच आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बोर्डावर संचालक असलेल्या जलाल यांनी सोमवारी याची पुष्टी केली. क्रिकेटच्या हितासाठी पदाचा राजीनामा दिल्याचे जलाल यांनी सांगितले. 5 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांनंतर सरकारमध्ये बदल झाल्यापासून ते सध्याच्या मंडळातून राजीनामा देणारे पहिले संचालक आहेत. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनीही क्रिकेटच्या हितासाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवल्याने भविष्यात बोर्डात मोठा बदल अपेक्षित आहेत.
त्याचवेळी देशातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात पोहोचला आहे. या दौऱ्यात 21 ऑगस्टपासून दोन्ही देशांदरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिली कसोटी रावळपिंडीत होईल. तर दुसरी कसोटीही रावळपिंडीत 30 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. याआधी हा सामना कराचीतील नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. पाकिस्तान दौऱ्यानंतर बांगलादेश 2 कसोटी आणि 3 T20I सामन्यांसाठी भारतात येणार आहे. बांगलादेशचा भारत दौरा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
या सर्व प्रकारामुळे बांगलादेशकडून मोठ्या कालावधीनंतर मिळालेले विश्वचषकाचे यजमानपद जाऊ शकते. बांगलादेश 10 वर्षानंतर महिला टी20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. बांगलादेश यजमानपद भूषवण्यासाठी तयार नसेल तर, झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने विश्वचषक आयोजनाची तयारी दाखवली आहे. तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यापूर्वीच, यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आधी 10 रुपये, आता संपूर्ण आयुष्याची कमाई…’, विनेश फोगटला भावाकडून रक्षाबंधनचे खास गिफ्ट
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाने दिला भारताला इशारा…!
ईशान किशनचा जोरदार कमबॅक! शेवटच्या ओव्हरमध्ये तुफानी षटकार मारत मिळवून दिला विजय