---Advertisement---

आपल्याच सहकाऱ्याला लगावली होती कानशिलात, आता १८ महिन्यांनंतर पुनरागमन करणार ‘हा’ बांग्लादेशी खेळाडू

On: शनिवार, जून 5, 2021 8:48 PM
bangladesh
---Advertisement---

बांग्लादेशी क्रिकेटपटू आपल्या वादग्रस्त वर्तनासाठी क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहेत. कधी प्रतिस्पर्धी खेळाडूंना डिवचण्यासाठी, तर कधी अपशब्द वापरून वाद घालण्यासाठी ते नेहमीच चर्चेत असतात. इतकेच नव्हे तर आपल्याच संघातील खेळाडूंवर हात उगारण्यामुळे देखील ते चर्चेत येतात. मात्र दोन वर्षांपूर्वी एका बांग्लादेशी खेळाडूने आपल्याच सहकाऱ्यावर केवळ हात उगारला नव्हता तर चक्क कानशिलात लगावली होती. या खेळाडूचे नाव आहे शहादत हुसेन.

वेगवान गोलंदाज असलेल्या शहादत हुसेनने एका प्रथम श्रेणी सामन्यात हे कृत्य केले होते. ज्यामुळे त्याच्यावर बंदी देखील घालण्यात आली होती. मात्र आता या बंदीनंतर तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शहादत हुसेनवर खरंतर या कृत्यासाठी पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ज्याचे आत्ता केवळ १८ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र तरीही तो ढाका प्रिमियर लीगच्या सामन्यातून पुनरागमन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात बांग्लादेश क्रिकेट बोर्डातर्फे अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हुसेनचे पुनरागमन निश्चित मानल्या जाते आहे.

हुसेनने फेब्रुवारी महिन्यात बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडे आपल्या बंदीचा कालावधी कमी करण्यात यावा, अशी विनंती केली होती. हुसेनची आई कॅन्सरग्रस्त असल्याने तिच्या उपचाराचा खर्च ही एक त्याच्या पुढील समस्या आहे. या खर्चाचा भार पेलता यावा, यासाठी आपली कारकीर्द पुन्हा सुरू करू द्यावी, अशी मागणी हुसेनने केली होती. याच मुद्दय़ावरून बोर्डाने हुसेनवरील बंदीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला असल्याचे कळते.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अक्रम खान यांनी यापूर्वी एका वक्तव्यात शहादत हुसेनची ही समस्या बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली असल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते, “शहादत आपल्या कौटुंबिक अडचणींमुळे समस्येत आहे. त्याच्या आईला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. अशा परिस्थितीत उपचाराच्या खर्चाचा भार उचलण्यासाठी त्याला कारकीर्द पुन्हा सुरू करता येणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही बोर्डाच्या शिस्तपालन समितीकडे शिफारस केली आहे. त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

नोव्हेंबर २०१९ मध्ये शहादत हुसेनने एका स्थानिक क्रिकेट सामन्यात थोबाडीत मारली होती. सामन्यातून बाहेर केल्यानंतर त्याच्यावर चौथ्या स्तरावरील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला होता. ज्या अंतर्गत त्याच्यावर एक लाख बांग्लादेशी रुपयांचा दंड आणि दोन वर्षांचे निलंबन व पाच वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता कौटुंबिक समस्येचा विचार करून बोर्ड त्याला पाच वर्षांच्या आतच पुनरागमनाची संधी देईल, अशी चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जिद्द असावी तर अशी! पाकिस्तान टी२० संघात वजनदार फलंदाजाची एंट्री, वर्षभरात घटवलं ३० किलो वजन

एकाचं पोट दुखलं, दुसऱ्याची गोलंदाजी नडली; क्रिकेट इतिहासातील एकमेव षटक, ज्यात तिघांनी केली गोलंदाजी

‘कधीच विचार केला नव्हता हॉटेलमध्ये माझ्यासोबत इतके दिग्गज असतील’, २००८ आयपीएल गाजवलेल्या खेळाडूचा आठणींना उजाळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---