बांगलादेश संघ आगामी टी-20 वर्ल्ड कप खेळणार नाही. आयसीसीने (ICC) बांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंडला संधी दिली आहे. या घडामोडीनंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी (Mohsin Naqvi) यांनी एका पत्रकार परिषदेत पाकिस्तान देखील टी-20 वर्ल्ड कप 2026 मधून माघार घेऊ शकतो, अशी धमकी दिली. नकवी म्हणाले की, पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय देशाचे पंतप्रधान घेतील.
मोहसिन नकवी यांच्या या विधानानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) त्यांना चांगलेच सुनावले आहे. रिपोर्ट्सनुसार हरभजन म्हणाला, पाकिस्तान गढूळ पाण्यात मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहे. ते भारत विरुद्ध पाकिस्तान आणि बांगलादेश असे ‘2 विरुद्ध 1’ चे राजकारण खेळत होते. पाकिस्तान आधीच श्रीलंकेत खेळत आहे, मग जिथे गरज नाही तिथे नाक खुपसण्याचे काय कारण? या सगळ्या वादात शेवटी नुकसान मात्र बांगलादेशचे क्रिकेट आणि त्यांच्या खेळाडूंचेच होत आहे.
मोहसिन नकवी यांनी 24 जानेवारीला वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचे विधान केले होते, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे 25 जानेवारीला पाकिस्तानने वर्ल्ड कप 2026 साठी आपल्या संघाची घोषणाही करून टाकली. तरीही, बांगलादेशची बाजू घेण्यासाठी पाकिस्तान वर्ल्ड कपमधून माघार घेण्याची शक्यता अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये वर्तवली जात आहे.
नकवी यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या देशाबाहेर आहेत. ते परतल्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. सरकारचा निर्णय अंतिम असेल. जर सरकारने नकार दिला, तर आयसीसी पाकिस्तानच्या जागी दुसऱ्या कोणत्याही टीमला घेऊ शकते.






