भारत आणि बांगलादेश या संघांमध्येे मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना मीरपूर येथे खेळवला गेला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या या दुसऱ्या सामन्याची दिशा बदलून टाकली. यजमान संघाच्या स्टार अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन याने धमाकेदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. हा सामना पूर्णपणे बांगलादेशच्या हातात होता. 145 या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने आपले 7 गडी 100 धावांच्या आतच गमावले होते. मात्र, भारताच्या या डावात बांगलादेशच्या एका क्षेत्ररक्षकाकडून झालेल्या चूकीमुळे बांगलादेशला सामना गमवावा लागला.
भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाज लवकर झटपट बाद झाले होते. तेव्हा 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या आर अश्विन (R Ashwin) याने अष्टपैलू कामगिरी करत सामन्याची दिशा बदलून टाकली. त्याने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्यासोबत मिळून अर्धशतकीय भागीदारी केली. मात्र, सामन्यात अशी एक वेळ आली जेव्हा 5 विकेट घेणाऱ्या मेहदी हसन (Mehidy Hasan) याच्या फिरकीच्या जाळ्यात अश्विन फसला होता. तेव्हा अश्विनच्या लेग साईडला क्षेत्ररक्षण करत असलेल्या मोमिनुल हक (Mominul Haq) याच्या दिशेने त्याचा झेल गेला. मात्र, त्याच्या हातून तो चेंडू सटकला. त्यानंतर अश्विनने मागे वळून पाहिले नाही आणि 42 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. त्याच्या या प्रदर्शनामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
दोन्ही डावांचा तुलनात्मक आढावा
बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 227 धावांवर गारद झाला. याचे प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात 314 धावा केल्या. तसेच, दुसऱ्या डावात यजमान संघातर्फे लिटन दास आणि झाकीर हसन यांनी अर्धशतकी खेळी करत भारतासमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. मात्र, अश्विन आणि अय्यर या दोघांनी मिळून बांगलादेशच्या हातातून विजयश्री खेचून आणली.
या मालिकेनंतर भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. भारत आणि श्रीलंका या संघात 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दोन्ही संघांमध्ये पहिला टी20 सामना 3 जानेवारीला खेळला जाणार आहे. तसेच एकदिवसीय मालिकेची सुरुवात 10 जानेवारी पासून होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पेले यांची तब्येत नाजूक, जवळचे व्यक्ती करतायेत हॉस्पिटलमध्ये गर्दी; मुलीची भावूक पोस्ट व्हायरल
“कर्णधार एक सांगतो अन् खेळाडू करतात एक”, संघ सहकारीच टीम इंडियावर भडकला






