इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे (आयपीएल २०२२, IPL 2022) बिगूल वाजले असून २६ मार्चपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. तर २९ मे रोजी आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा अंतिम सामना होईल. परंतु याचदरम्यान काही क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय सामनेही होणार असल्याने बरेच परदेशी खेळाडू आयपीएल सामन्यांमध्ये अनुपलब्ध असू शकतात. १८ मार्चपासून बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (Bangladesh Tour Of South Africa) येणार आहे. या दौऱ्यात उभय संघ १२ एप्रिलपर्यंत ३ सामन्यांच्या वनडे मालिका आणि २ सामन्यांच्या कसोटी मालिका खेळतील.
अशात दक्षिण आफ्रिका संघातील काही खेळाडूंपुढे दुविधा निर्माण झाली आहे की, त्यांनी बांगलादेशविरुद्ध सामने खेळावेत की आयपीएलला प्राथमिकता द्यावी?. अशात अधिकतर दक्षिण आफ्रिकी खेळाडू आयपीएलला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा दुय्यम दर्जाचा संघ निवडला जाऊ शकतो.
क्रिकइंफोमधील वृत्तानुसार, “आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी मिळून असा निर्णय घेतला आहे की, ते बांगलादेशविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेऐवजी आयपीएलला प्राधान्य देणार आहेत.” काही दिवसांपूर्वी क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने त्यांच्या खेळाडूंना आयपीएल आणि बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका, यांपैकी एक पर्याय निवडण्याची मुभा दिली होती. तसेच क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि बीसीसीआय यांच्यात आयपीएलवरून बोलणेही झाले आहे, ज्यामध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी एनओसीही दिला आहे.
आयपीएल २०२२ च्या हंगामात दक्षिण आफ्रिकेचे कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, मार्को जेन्सन हे प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज सहभागी आहेत. रबाडा पंजाब किंग्ज संघाचा भाग आहे. तर एन्गिडी दिल्ली कॅपिटल्स आणि जेन्सन सनरायझर्स हैदाराबाद संघात सहभागी आहेत.
असे आहे दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघांचे वेळापत्रक
१८ मार्चपासून दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना २० मार्च आणि तिसरा व शेवटचा सामना २३ मार्च रोजी होईल. त्यानंतर ३१ मार्चपासून उभय संघ २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आमने सामने येतील. ४ एप्रिल रोजी पहिला कसोटी सामना संपेल. त्यानंतर ८ ते १२ एप्रिलदरम्यान दुसरा कसोटी सामना होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, पहिल्यांदाच वनडे विश्वचषकात चारली धूळ
जुन्नरचा कौशल तांबे दिल्ली कॅपिटल्स संघासाठी निभावणार महत्त्वाची जबाबदारी
‘बेबीसिटर’ पंत! संघ-सहकाऱ्याच्या मुलासोबत खेळताना दिसला टोपीचा अनोखा खेळ, पाहा क्यूट व्हिडिओ