मुंबई । ऑक्टोबरमध्ये बांगलादेश संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तेथे 14 दिवसांचा क्वारंटाइनचा कालावधी मालिकेसाठी धोकादायक ठरू शकते.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) शनिवारी सांगितले की, ‘त्यांचा संघ तीन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंका दौर्यावर जाण्यास तयार आहे. यजमान देश चौदा ऐवजी सात दिवस क्वारंटाईन अनिवार्य ठेवण्याच्या निर्णयावर कायम राहिले तरच संघ श्रीलंका दौऱ्यावर जाईल.’
बीसीबीचे मुख्य कार्यकारी निजामुद्दीन चौधरी म्हणाले, ‘आम्ही नियमितपणे श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) बरोबर संवाद साधत आहोत. आम्ही त्यांच्याकडून सविस्तर योजना मागितल्या. त्यांनी आम्हाला सांगितले की, ते आरोग्य मंत्रालयाशी क्वारंटाइन कालावधीबद्दल बोलत आहेत. एसएलसीने आम्हाला सांगितले की, तेथे पोहोचल्यानंतर पहिल्या सात दिवस क्वारंटाइनमध्ये राहिले पाहिजे, त्यानंतर खेळाडू सराव सत्रात भाग घेऊ शकतात.”
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात मालिका जुलै ते ऑगस्टमध्ये होणार होती, पण कोविड -19 साथीच्या रोगामुळे ती 27 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल.






