बांगलादेशनं अंडर 19 आशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा 59 धावांनी पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग पूर्णपणे फ्लॉप ठरली. भारताकडून कर्णधार मोहम्मद अमाननं 26 धावांची खेळी केली, तर हार्दिक राजनं 24 धावांचं योगदान दिलं. बांगलादेशनं भारताला विजयासाठी 199 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात, टीम इंडिया 139 धावांवर ऑलआऊट झाली.
बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी सलामीला आले. मात्र या दोन्ही फलंदाजांना विशेष काही करता आलं नाही. आयुष अवघी 1 धावा करून बाद झाला. वैभव 9 धावा करून तंबूत परतला. आंद्रे सिद्धार्थ आणि केपी कार्तिकेयानं काही धावा जोडल्या. सिद्धार्थनं 3 चौकारांच्या मदतीनं 20 धावांची खेळी केली, तर कार्तिकेय 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
कर्णधार मोहम्मद अमान 26 धावा करून बाद झाला. निखिल कुमारला खातंही उघडता आलं नाही. यष्टिरक्षक फलंदाज हरवंश सिंग 6 धावा करून परतला. किरण चोरमले 1 धावा करून बाद झाला. हार्दिक राजनं थोडाफार संघर्ष केला. त्यानं 21 चेंडूत 24 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्यानं 3 चौकार मारले.
भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशनं 198 धावा केल्या होत्या. संघाकडून रिझान हुसेननं 47 धावांची चांगली खेळी केली. त्यानं 3 चौकार मारले. शिहाबनं 40 धावांची खेळी खेळली. त्यानं 3 चौकार आणि 1 षटकार मारला. कर्णधार अझीझुल हकीम तमीम 16 धावा करून बाद झाला. फरीद हसननं 39 धावांचं योगदान दिलं.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर टीम इंडियानं सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र फायनलमध्ये भारताच्या हाती निराश आली. अशाप्रकारे भारताच्या अंडर 19 आशिया चषक जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.
हेही वाचा –
ॲडलेडमध्ये इतिहास घडला! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना फक्त इतक्या चेंडूत संपला!
ॲडलेडमध्ये सर्वच फेल! या 3 खेळाडूंमुळे झाला भारताचा पराभव
WTC इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज! पॅट कमिन्सनं मोडला बुमराहचा मोठा रकॉर्ड





