आयसीसीने शुक्रवारी (३ सप्टेंबर) टी -२० क्रमवारी जाहीर केल्या. विशेष बाब म्हणजे ताज्या क्रमवारीत बांगलादेश क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. बांगलादेश आता टी -२० क्रमवारीत सहाव्या स्थानावर गेला आहे, तर ऑस्ट्रेलिया संघ सध्या सातव्या स्थानावर फेकला गेला आहे.
अलीकडेच, महमूदुल्लाह रियाधच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत ४-१ ने पराभूत केले होते. सध्या न्यूझीलंड संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेशच्या संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत पाहुण्या न्यूझीलंड विरुद्ध सध्या २-० अशी आघाडी घेतली आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाचे आता टी-२० क्रिकेटमध्ये एकूण २४१ गुण आहेत, तर ऑस्ट्रेलियाचे २४० गुण आहेत. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलिया संघात डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस आणि पॅट कमिन्स खेळत नव्हते, ज्यामुळे या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलिया संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आगामी टी-२० विश्वचषक पाहता बांगलादेश संघासाठी ही चांगली बातमी आहे. जर बांगलादेश संघाने अशीच कामगिरी यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही सुरू ठेवली, तर ते अनेक मोठ्या संघांसाठी अडचणी निर्माण करू शकतात.
टी-२० क्रिकेटच्या पहिल्या पाच संघांबद्दल बोलायचे झाले, तर इंग्लंड आयसीसी क्रमवारीत २७८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. यानंतर भारत २७३ गुणांसह दुसऱ्या, पाकिस्तान २६१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे २५७ गुण असून ते या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिका २४६ गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे.
कोरोनाच्या संकटामुळे भारतात खेळवण्यात येणारा टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. या भव्य स्पर्धेतील गट आयसीसीने नुकतेच जाहीर केले आहेत.
सुपर-१२ फेरीतील दोन गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही गट- २ मध्ये आहेत. या दोघांसोबत या गटामध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ गट-१ मध्ये असतील. तसेच दोन्ही संघात प्रत्येकी २ संघ पात्रता फेरीतून सामील होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनचा मोठा विक्रम! रोहित ‘असा’ विक्रम करणारा सचिन पाठोपाठ जगातला दुसराच सलामीवीर
देशवासियांची मान उंचावली! बॅडमिंटनमध्ये प्रमोदने जिंकले ‘सुवर्ण’, तर मनोजच्या नावावर ‘कांस्य’