आपल्याला माहिती आहे की, भारतात क्रिकेटला जणू धर्माप्रमाणेच मानलं जातं. त्यामुळे अनेक मोठ-मोठ्या कंपन्या भारतात क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यास रांगा लावून असतात. नव्या- जुन्या आणि हटके ढंगातील स्ट्रॅटेर्जी घेऊन या कंपन्या क्रिकेट सामन्यातून त्यांच्या ब्रँडची जाहिरात करत असतात. यामध्ये बॅट स्पॉर्न्सरशीप देखील ब्रँडची जाहिरात करण्याची एक जुनी पण प्रभावी स्ट्रॅटर्जी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू जितकी चांगली कामगिरी करतो, तितकीच त्याच्यावर पैशांची उधळण होते. आता खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतायेत म्हणल्यावर मोठ्या कपंन्यांचे लक्ष तर वेधून घेणारच.
या कंपन्या खेळाडूंच्या बॅटवर त्यांच्या ब्रँडचे स्टिकर लावण्यासाठी मोठी रक्कमही मोजतात. त्यामुळे कपंन्यांच्या ब्रँड्सचीही मोठी जाहीरात होत असते. फलंदाजांच्या बॅटच्या स्टिकरची चर्चा प्रत्येक व्यक्ती करत असतो. आपल्या आवडत्या खेळाडूच्या बॅटवर कोणत्या ब्रँडचे स्टिकर आहे, त्यातून त्यांना किती रुपये मिळतात, याची त्यांना उत्सुकता लागलेली असते. या लेखातही आपण भारतीय क्रिकेटपटू आपल्या बॅटवर ब्रँडचे स्टिकर लावण्यासाठी किती रुपये मोजतात, याबद्दल जाणून घेणार आहोत.
रोहित शर्मा
रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील भारतीय संघाचा नियमित कर्णधार बनला आहे. रोहित नोव्हेंबर २०१५ पासून ‘सीइएटी’चे म्हणजेच ‘सीएट’चे स्टिकर लावलेली बॅट वापरतोय. यासाठी रोहितला प्रत्येक वर्षाला सीएटकडून ३ कोटी रुपये मिळतात. २०१८ मध्ये सीएटने रोहितबरोबर आणखी ३ वर्षांसाठी हा करार वाढवलेला. रोहित भारतीय संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत ४० हून अधिक कसोटी सामने खेळले असून ३ हजारांपेक्षा जास्त धावा केल्यात. त्याचबरोबर त्याने २२० हून अधिक वनडेत ९ हजारांहून अधिक धावा केल्यात.
तो २०१८पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १२० हून अधिक सामन्यात ६००० पेक्षा जास्त धावा केल्यात. तसेच रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४१ शतकेही ठोकलीत.
शिखर धवन
भारतीय संघात गब्बर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू म्हणजे शिखर धवन. धवन सध्या शिखर भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. पण तो मर्यादीत षटकांच्या भारतीय क्रिकेट संघाचा नियमित सदस्य आहे. धवनच्या बॅटवरील स्टिकरबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘मद्रास रबर फॅक्टरी’ म्हणजेच ‘एमआरएफ’चे स्टिकर लावलेली बॅट वापरतो. त्यासाठी धवनला एमआरफ एका वर्षासाठी ३ कोटी रुपये देते. आतापर्यंत एमआरएफचे स्टिकर लावलेली बॅट अनेक दिग्गजांनी वापरली आहे. त्यात, स्टीव्ह वॉ, ब्रायन लारा अन् मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे.
शिखरने आतापर्यंत भारताकडून खेळताना अनेक मोठ्या खेळी केल्यात. त्याने आत्तापर्यंत ३४ कसोटी सामन्यात २३१५ धावा केल्या आहेत. त्याने १४० हून अधिक वनडे सामन्यात ६ हजारांहून अधिक धावा केल्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धवनने आतापर्यंत २४ शतके ठोकलीत.
एमएस धोनी
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील काही वर्षांपासून ‘स्पार्टन’शी जोडला गेला आहे. त्याने डिसेंबर २०१३ मध्ये पहिल्यांदा स्पार्टनशी तब्बल २५ कोटींचा ३ वर्षांसाठी करार केलेला. ऑस्ट्रेलियामधील ब्रँड असलेल्या स्पार्टनबरोबरील कराराचे २०१६ मध्ये धोनीने नुतनीकरण केलेले. त्याने पुन्हा त्यांच्याबरोबरच ३ आणखी वर्षांचा करार केलेला, हा करार यावेळी होता १३ कोटींचा.
धोनीला भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीन आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्यात. पण त्याने २०२० साली स्वातंत्रदिनाच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकलेला. मात्र, यानंतर तो आयपीएलमध्येही खेळताना दिसला.
धोनीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने खेळताना ४८७६ धावा केल्यात. तसेच वनडेमध्ये त्याने ३५० सामन्यात ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्यात. त्याचबरोबर धोनीने ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना १६१७ धवा केल्यात. त्याच्या नावावर १६ शतके आहेत.
विराट कोहली
सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होणारा विराट कोहलीही ‘एमआरएफ’ची बॅट वापरतो. त्याने २०१५ ला पहिल्यांदा एमआरएफबरोबर ३ वर्षांसाठी ८ कोटींचा करार केला होता. त्यानंतर त्याने २०१७ ला त्याच्या कराराचे नुतनीकरण केले. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या करारापेक्षा त्याला तब्बल ७० टक्के अधिक रक्कम नवीन करारातून मिळते. त्याचा नवीन करार ८ वर्षांसाठी असून ११० कोटी रुपयांचा आहे. म्हणजेच त्याला वर्षाला १३.७५ कोटी रुपये मिळतात.
विराटने आतापर्यंत १०० कसोटी सामने खेळलेत. त्यात त्याने ७५०० हून अधिक धावा केल्यात. तसेच वनडेत त्याने २०० हून अधिक, तर टी२०मध्ये ९० पेक्षा जास्त सामने खेळलेत. त्याने वनडेत १२००० धावांचा टप्पा ओलांडला आहे, तर टी२० मध्ये ३ हजारांहून अधिक धावा केल्यात. त्याच्या नावावर ७० शतकेही आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
विराट आणि सचिन यांच्यातील नाते सांगणारे ४ भन्नाट किस्से
स्वत:च्याच देशाविरुद्ध शतक ठोकणारा सायमंड्स, वाचा त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या १० गोष्टी