इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना लवकरच प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ४७ सामने खेळले गेले आहेत. भारतात स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आली होती. तर उर्वरित सामने हे यूएईमध्ये खेळवले जात आहेत. यूएईमध्ये पार पडत असलेले सामने शेवटच्या षटकापर्यंत रंगत आहेत. त्यामुळे चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. यादरम्यान ४ शतक देखील झळकावले गेले आहेत. मुख्य बाब म्हणजे यात ३ भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. पण नेमके कोण आहेत ते फलंदाज?
१) संजू सॅमसन :
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिलेवहिले शतक झळकावले होते. त्याने या हंगामातील चौथ्या सामन्यात ६३ चेंडूंमध्ये ११९ धावांची तुफानी खेळी केली होती. यामध्ये १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. या सामन्यात पंजाब किंग्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी २२२ धावांचे आव्हान दिले होते. परंतु संजू सॅमसनच्या शतकी खेळीनंतरही राजस्थानला २१७ धावा करण्यात यश आले होते.
२) देवदत्त पडीक्कल :
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कल याने या हंगामातील दुसरे शतक झळकावले होते. त्याने या हंगामातील १६ व्या सामन्यात हा कारनामा केला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासमोर १७८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना देवदत्त पडीक्कलने ५२ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर नाबाद १०१ धावांची खेळी केली होती.
३) जोस बटलर :
राजस्थान रॉयल्स संघाचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर याने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम फलंदाजी केली होती. त्याने या स्पर्धेतील २८ व्या सामन्यात सनरायझर्स संघाविरुद्ध शतक झळकावले होते. प्रथम फलंदाजी करत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर ३ गडी बाद २२० धावा करण्यात यश आले होते. यामध्ये जोस बटलरने सर्वाधिक १२४ धावांचे योगदान दिले होते. त्याने ६४ चेंडुंमध्ये १९३.७५ च्या स्ट्राइक रेटने ११ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकारांच्या साहाय्याने १२४ धावांची खेळी केली होती.
४) ऋतुराज गायकवाड :
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने या आयपीएल २०२१ स्पर्धेतील चौथे तर आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावले. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. यामध्ये ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक १०१ धावांचे योगदान दिले होते. त्याने ६० चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. यामध्ये ९ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.
परंतु राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेच्या तुफान फटकेबाजी मुळे चेन्नई सुपर किंग्स संघाला या सामन्यात विजय मिळवता आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
पावरप्लेमध्ये जयस्वालचा झंझावात, ताबडतोब अर्धशतक ठोकत रैना-राहुलसारखी कामगिरी करण्यात ‘यशस्वी’
… अन् चाहत्यांच्या काळजात झाले चर्र! फाफ आणि मुस्तफिजुरमध्ये जोराची धडक, मैदानावरच लागले विव्हळू
अबुधाबीमध्ये ऋतु’राज’! आयपीएल २०२१ मधील सर्वात लांब षटकारासह गायकवाडने केले शतक पूर्ण, पाहा व्हिडिओ