MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) सुरू होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित करत असलेल्या या स्पर्धेचा हा तिसरा हंगाम असेल. स्पर्धेचे पहिले दोन हंगाम तुफान यशस्वी झाले होते. त्यापैकी पहिल्या हंगामात सर्वाधिक अर्धशतके ठोकणाऱ्या फलंदाजांची यादी आपण पाहूया. (batters who scored most fifties in mpl 2025)
एमपीएलचा पहिला हंगाम म्हणजेच एमपीएल 2023 खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने गाजवला तो म्हणजे पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा अनुभवी फलंदाज अंकित बावणे (Ankeet Bawne). त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवत ऑरेंज कॅप जिंकली होती. तसेच त्यानेच स्पर्धेच्या इतिहासातील पहिले शतक झळकावले. त्याचा संघ अंतिम सामन्यात देखील खेळला होता. यासोबतच, त्याने स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके ठोकलेली. संपूर्ण स्पर्धेत सात सामने खेळताना 72.40 च्या दमदार सरासरीने 362 धावा केल्या होत्या. यामध्ये तीन अर्धशतके सामील होती. तसेच, एका सामन्यात त्याने शतक देखील पूर्ण केलेले.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचे पहिल्या हंगामात नेतृत्व केलेला दिग्गज केदार जाधव (Kedar Jadhav) या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याला सात सामन्यात फक्त 198 धावा करता आल्या असल्या तरी, त्याने दोन अर्धशतके झळकावत आपल्या संघाच्या विजयात योगदान दिलेले. त्याच्या नेतृत्वात कोल्हापूर संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करणारा व भारतीय संघातील सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा पहिल्या हंगामात केवळ चार सामने खेळू शकलेला. मात्र, फलंदाज म्हणून त्याने या चारही सामन्यात आपली छाप पाडलेली. त्याने चार सामन्यात 168 धावा बनवलेल्या. यामध्ये दोन अर्धशतके समाविष्ट होती. तो नेतृत्व करत असलेल्या पुणेरी बाप्पा संघाला एमपीएलच्या पहिल्या हंगामात तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागलेले.
ऋतुराज नेतृत्व करत असलेल्या पुणेरी बाप्पा संघाचा सलामीवीर पवन शहा (Pavan Shah) याने सात सामन्यात 185 धावा काढल्या होत्या. यामध्ये त्याने दोन अर्धशतके साजरी केलेली. याव्यतिरिक्त ईगल नाशिक टायटन्सचा अर्शिन कुलकर्णी हा तीन सामन्यात एक शतक व एक अर्धशतक ठोकण्यात यशस्वी झालेला.
एमपीएल 2023 मध्ये सात असे फलंदाज होते, ज्यांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावलेले. यामध्ये धीरज फटांगरे, राहुल त्रिपाठी, मुर्तझा ट्रंकवाला, वृषभ राठोड, प्रीतम पाटील, मंदार भंडारी व अजीम काझी यांचा समावेश होता.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत या स्पर्धेचे आयोजन होत आहे. मावळ तालुक्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम 4 जून ते 24 जून या काळात ही देखणी स्पर्धा पार पडेल. यावर्षी प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील खेळली जाईल. देशात प्रथमच कोणतीही राज्य क्रिकेट संघटना महिलांसाठी, टी20 लीग आयोजित करत आहे. या दोन्ही स्पर्धांचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar या ओटीपी प्लॅटफॉर्मवर होईल. तर, Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर घरबसल्या सामने पाहता येणार आहेत. एमसीएने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये विनाशुल्क प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)






