मुंबई। चेन्नई सुपर किंग्स संघाला इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभवाचा धक्का बसला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईविरुद्ध गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईचा हा या आयपीएल मोसमातील ९ वा पराभव होता. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी निराश झाल्याचे दिसले, तसेच त्याने सामन्यात कुठे चूक झाली, हे देखील स्पष्ट केले.
तो निर्णय चूकला
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर धोनी (MS Dhoni) म्हणाला, ‘सुरुवात करण्यासाठी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य नव्हता. पहिल्या डावात वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळणे सोपे नव्हते. यातुलनेत दुसऱ्या डावात खेळणे थोडे सोपे होते. दोन्ही संघांचे फिरकीपटूही चांगले होते. मधल्या षटकात काही आणखी धावा झाल्या असत्या, तर चांगले राहिले असते.’
तसेच धोनीने गुजरातकडून खेळणाऱ्या साई किशोरचेही (Sai Kishore) कौतुक केले. तो म्हणाला, ‘साई किशोरने चांगली गोलंदाजी केली. आम्ही शिवम दुबेला फलंदाजी क्रमवारीत बढती देऊ शकत होतो. पण, एन जगदीशनला संघात घेण्याचा उद्देश सफल झाला नसता. आम्हाला असे वाटत होते की, एन जगदीशनने खेळपट्टीवर काही वेळ घालवावा.’
तसेच धोनीने श्रीलंकेचा युवा गोलंदाज मिथीशा पाथिरानाचेही (Matheesha Pathirana) कौतुक केले. पाथिरानाने चेन्नईकडून या सामन्यातून पदार्पण केले. धोनी त्याच्याबद्दल बोलताना म्हणाला, ‘मला वाटते पाथिरानाने चांगली गोलंदाजी केली. तो काहीसा मलिंगासारखाच आहे. त्याची जशी गोलंदाजी शैली आहे, त्यात चूका होण्याची शक्यता जास्त असते. पण त्याने चांगली गोलंदाजी केली. त्याने स्लोअर बॉल चांगले टाकले. आम्हाला खेळाडूंना मैदानात वेळ द्यायचा आहे. मला वाटते की, हे महत्त्वाचे आहे की, आम्ही त्या खेळाडूंना अंतिम ११ मध्ये स्थान द्यावे, ज्यांना खेळण्याची संधी मिळालेली नाही.’
चेन्नईचा ९ वा पराभव
या सामन्यात (Chennai Super Kings vs Gujarat Titans) चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, फलंदाजीवेळी चेन्नई सुपर किंग्स संघ संघर्ष करताना दिसला. त्यांना २० षटकात ५ बाद १३३ धावाच करता आल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ४९ चेंडूत ५३ धावांचे योगदान दिले. तसेच एन जगदीशनने नाबाद ३९ धावा केल्या, तर मोईन अलीने २१ धावा केल्या. या व्यतिरिक्त अन्य कोणाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग गुजरातने १९.१ षटकातच ३ विकेट्स गमावत पूर्ण केला. गुजरातकडून वृद्धिमान साहाने महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. तर त्याला अन्य फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत साथ दिली. साहाने ५७ चेंडूत नाबाद ६७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. चेन्नईकडून मथीशा पाथिरानाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्सची ही पहिलीच वेळ आहे की, त्यांनी आयपीएल हंगामात साखळी फेरीत ९ सामने गमावले आहेत. यापूर्वी, त्यांनी २०२० साली ८ सामन्यांमध्ये पराभव स्विकारला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
अँड्र्यू सायमंड्सला ‘रॉय’ का म्हणतात तरी का? रोचक आहे कारण
गुजरातचे शानदार नेतृत्व करण्याचे श्रेय मुंबई इंडियन्सचे? पाहा काय म्हणतोय हार्दिक पंड्या
तब्बल ९ वेळा पुनरागमनाची संधी मिळालेला ‘विनोद कांबळी’; जाणून घ्या त्याच्या प्रवासाबद्दल