जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला शुक्रवारी (९ एप्रिल) थरारक अंदाजात सुरुवात झाली. एबी डिव्हिलियर्स व हर्षल पटेल यांनी आरसीबीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आरसीबी व मुंबई इंडियन्स या दिग्गजांनी भरलेल्या संघांमध्ये हंगामातील हा पहिला सामना उत्कंठावर्धक ठरला आणि अखेरच्या चेंडूवर आरसीबीने सामना आपल्या नावे केला.
बॅटल ऑफ जायंट्स
दिग्गजांच्या या मुकाबल्यात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या दोन विदेशी खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनुक्रमे मुंबई इंडियन्स व आरसीबीसाठी खेळणारे हे दोन वेगवान गोलंदाज म्हणजे मार्को जेन्सन व काईल जेमिसन. या दोन खेळाडूंमधील स्पर्धेला ‘बॅटल ऑफ जायंट्स’ म्हटले गेले. दोन्ही खेळाडू प्रत्येकी ६ फुट ८ इंच उंचीचे आहेत आणि आपल्या संघाच्या हर्डलमध्ये दोघांचे वेगळेपण स्पष्टपणे दिसून येत होते.
दोघांचा पहिला आयपीएल हंगाम
न्यूझीलंडसाठी मागील वर्षी भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या २६ वर्षीय जेमिसनला आयपीएल २०२१ च्या लिलावात आरसीबीने तब्बल १५ कोटी अशी मोठी रक्कम मोजत आपल्या ताफ्यात सामील केले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा अठरा वर्षीय युवा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सन याला मुंबई इंडियन्सने २० लाखांची बोली लावली. जेन्सन अजून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.
दमदार आयपीएल पदार्पण
जेमिसन आपल्या पहिल्याच सामन्यात विजयी संघाचा भाग बनला. त्याने आपल्या चार षटकांच्या कोट्यात २७ धावा देऊन एक बळी मिळविला. दुसरीकडे, जेन्सननेही चार षटकात २८ धावा देऊन दोन गड्यांना तंबूत धाडले. सामन्यातील अखेरचे षटक टाकताना त्याने सात धावांसाठी त्याने आरसीबीच्या फलंदाजांना झगडायला लावले. जेन्सन व जेमिसन या दोघांकडूनही त्यांच्या संघांना संपूर्ण हंगामात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीने केलं क्रिकेटमध्ये कमबॅक, चाहत्यांनी केलं ‘असं’ हटके स्वागत
हे पोरगं भारीय! सामना सुरू होण्याआधीच पंतने घेतली धोनीची मदत, पाहा व्हिडिओ






