Haris Rauf BBL 2023: क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे कधी काय होईल काही सांगता येत नाही. या खेळात असे अनेक किस्सेही पाहायला मिळतात, ज्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष त्याकडे वेधले जाते. असेच काहीसे बिग बॅश लीग स्पर्धेत घडले आहे. यावेळी पाकिस्तानी खेळाडूने आपल्या चुकीमुळे जगभरात हसू करून घेतलं आहे. चला तर, नेमकं काय घडलंय, हे जाणून घेऊयात…
ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित टी20 स्पर्धा बिग बॅश लीग 2023-24 (Big Bash League 2023-24) स्पर्धेतील 12वा सामना मेलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी थंडर (Melbourne Stars vs Sydney Thunder) संघात शनिवारी (दि. 23 डिसेंबर) पार पडला. या सामन्यादरम्यान मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळणारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf) गोलंदाजीसाठी स्वत:ला तयार करत होता, तेवढ्यात त्याचा नंबर आला.
खरं तर, मेलबर्नने सिडनी थंडर (Sydney Thunder) संघाविरुद्ध अखेरच्या षटकात 4 चेंडूत 4 विकेट्स गमावल्या, ज्यामुळे हॅरिस रौफला फलंदाजीसाठी मैदानावर उतरावे लागले. रौफला मेलबर्नच्या डावातील अखेरच्या चेंडूवर मैदानावर यावे लागले, यावेळी तो तयार नव्हता. तो बॅट, ग्लोव्ह्ज, हेल्मेट घेऊन धावत मैदानावर पोहोचला. यादरम्यान त्याने पॅड परिधान केले नव्हते. गोलंदाजी करत असलेल्या सिडनीचा गोलंदाज डॅनियल सॅम्स हे पाहून हैराण झाला. समालोचकांनीही याची थट्टा उडवली.
रौफला नॉन स्ट्रायकर एंडवर उभे राहायचे होते, पण त्याने ज्याप्रकारची जोखीम पत्करली, ते धोकादायक ठरू शकले असते. जर अखेरचा चेंडू नो बॉल किंवा वाईडवर लियाम डॉसनला एकेरी धाव घ्यावी लागली असती, तर रौफला पॅडशिवाय वेगवान गोलंदाज सॅम्सचा सामना करावा लागला असता. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रौफला का यावे लागले मैदानावर?
खरं तर, 19व्या षटकात मेलबर्नची धावसंख्या 6 बाद 170 धावा होती. अखेरचे षटक टाकण्यासाठी डॅनियल सॅम्स आला होता. त्याच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा आल्या. त्यानंतर सॅम्सने ब्यू वेबस्टरला आपल्याच चेंडूवर झेलबाद करत तंबूत पाठवले. त्यानंतर सॅम्सच्या चेंडूवर उसामा मीर ख्रिस ग्रीन याला झेल देऊन बाद झाला. सामन्यात दोन चेंडू उरले होते आणि मेलबर्न स्टार्सच्या दोन विकेट उरल्या होत्या. यानंतर मार्क स्टेकेटी धावबाद झाला आणि रौफला तयारीशिवाय मैदानावर यावे लागले. सॅम्सने अखेरचा चेंडूवर डॉसनला त्रिफळाचीत करत मेलबर्न स्टार्सच्या डावाचा शेवट केला.
सामन्यात मेलबर्नने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 10 विकेट्स गमावत 172 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनी थंडरने 18.2 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 176 धावा करत सामना 5 विकेट्सने नावावर केला. या सामन्याचा हिरो झमान खान ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (bbl 2023 four wickets fell in a row haris rauf had to bat without a pad video viral)
हेही वाचा-
Video । शॉट असा मारा की, बॉल शोधायला प्रेक्षक गेले पाहिजेत, BBLमध्ये डी कॉकचा राडा; पाहा गगनचुंबी Six
बिग ब्रेकिंग! ऋतुराज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, BCCIने सांगितले कुणाची लागली वर्णी