ऑस्ट्रेलियातील प्रमुख व्यवसायिक टी२० लीग बिग बॅश सध्या सुरू आहे. या स्पर्धेचा रोमांच दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. शनिवारी (२६) संपन्न झालेल्या सिडनी सिक्सर्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स यांच्यातील सामन्याने सर्वांची मने जिंकली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सिडनी सिक्सर्सने एका गड्याने रोमहर्षक विजय मिळवला. मात्र, या सामन्यात एक अप्रिय घटना घडता-घडता राहिली. फलंदाजाने मारलेला चेंडू पंचांना लागला. त्यामुळे पंचांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आहे. परंतु, यादरम्यान पंचांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने दुर्घटना घडली नाही.
पंच गिलेस्पी यांनी दाखवली सतर्कता
मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात सिडनी सिक्सर्स फलंदाजी करताना एक दुर्घटना होता होता राहिली. मेलबर्न स्टार्सने दिलेल्या १९४ धावांचा पाठलाग करताना, सिडनी सिक्सर्सने आपली धावगती राखली होती. सिडनीच्या डावातील १२ वे षटक चायनामन फिरकीपटू झहीर खान टाकत होता. झहीरने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर फलंदाज डॅनियल ख्रिस्टियनने समोरच्या दिशेने जोरदार फटका मारला.
ख्रिस्टियनने मारलेला फटका सरळ पंच असलेल्या फिल गिलेस्पी यांच्या दिशेने गेला. गिलेस्पी यांनी वेळीच सतर्कता दाखवत, चेंडू हाताने अडविला. त्यानंतर, सर्व खेळाडू पटकन गिलेस्पी यांच्याजवळ गेले आणि त्यांची विचारपूस केली. मात्र, सर्वकाही ठिक असल्याचे सांगत गिलेस्पी पुन्हा पुढील चेंडूसाठी उभे राहिले.
https://twitter.com/BBL/status/1342824161828192256
पंचांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूज याच्या मैदानावरील दुर्दैवी मृत्युनंतर पंचांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. अनेकदा काही पंच सामन्यादरम्यान हेल्मेट घालून पंचगिरी करतात. ऑस्ट्रेलियन पंच ब्रूस ऑक्सनफोर्ड नियमितपणे ‘आर्म प्रोटेक्टर’ घालून आपली जबाबदारी पार पाडत असतात.
अटीतटीच्या सामन्यात सिडनीचा विजय
अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात सिडनीने एक चेंडू राखून विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेल व निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर स्टार्सने २० षटकात १९३ धावा फटकावल्या होत्या. प्रत्युत्तरात, डॅनियल ह्यूजच्या ५१ चेंडूतील ९६ धावांच्या बळावर सिडनीने एक गडी व एक चेंडू राखून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. या विजयासह सिडनी सिक्सर्सचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs NZ: चालू सामन्यातच अज्ञात व्यक्ती नग्न अवस्थेत घुसला मैदानात; पुढे काय झालं पाहाच






