१९ वर्षांखालील भारतीय संघाने ३ फेब्रुवारीला चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला. या संघाच्या यशात सर्वात मोठा वाटा होता तो मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविडचा.
या यशासाठी बीसीसीआयने खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांना बक्षीस जाहीर केले होते. पण द्रविडने बाकीच्यांपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस घेण्यास नकार दिला. तसेच त्याने संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफला सारखे बक्षीस द्या अशी विनंती केली होती. ही विनंती रविवारी बीसीसीआयने मान्य केली आहे.
बीसीसीआयने याआधी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ५० लाख रुपये, खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये असे बक्षीस घोषित केले होते. याबद्दल द्रविड म्हणाला होता की, ” हे थोडेसे ओशाळवाणे आहे कारण माझ्याकडे खूप जास्त लक्ष वेधलं गेलं. पण खरंच यात सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंचे कष्ट आहेत. मला त्यांची नावे घ्यायची नाहीत पण सपोर्ट स्टाफने खूप कष्ट घेतले आहेत. आम्ही सर्वांनी मिळून या खेळाडूंसाठी चांगले देण्याचा प्रयन्त केला.”
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्ताप्रमाणे बीसीसीआयने सर्व प्रशिक्षक स्टाफला आता २५ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या म्हणण्याप्रमाणे बीसीसीआयच्या एका सदस्याने सांगितले, “जेव्हा बक्षीस जाहीर झाले होते तेव्हा बाकीच्यांपेक्षा जास्त बक्षीस मिळत असल्याने द्रविडने नाराजी व्यक्त केली होती. विश्वचषक विजयात सर्वांनी सारखी भूमिका निभावली असल्याच्या त्याच्या भावनेबद्दल त्याने बीसीसीआयला कळवले होते. त्याच्या या स्वतःच्या बक्षिसातील रक्कम कमी करण्याच्या निर्णयाबद्दल बीसीसीआयमधील अनेकांना आश्चर्य वाटले होते.”
द्रविडने १९ वर्षांखालील मार्गदर्शन करताना खेळाडूंचे लक्ष विचलित होणार नाही याकडे लक्ष्य दिले होते. त्यासाठी त्याने अंतिम सामान्यांपर्यंत फोनही न वापरण्याचा सल्ला खेळाडूंना दिला होता. त्याच्या या सल्याचेही खेळाडूंनी पालन केले होते.