भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (८ सप्टेंबर) टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला १५ सदस्यीय संघ घोषित केला. यामध्ये अनेक आश्चर्यकारक असे निर्णय घेण्यात आले होते. यादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र यानंतर एका नियमाचे उल्लंघन होत असल्याची तक्रार बीसीसीआयला एका पत्राद्वारे करण्यात आली होती.
मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे पूर्व सदस्य संजीव गुप्ता यांनी याबाबत बीसीसीआयच्या मुख्य परिषदेला (उच्च अधिकारी) तक्रार करत पत्र लिहिले. ज्यामध्ये त्यांनी धोनीला मार्गदर्शक बनवणे हे एका नियमाचे उल्लंघन असल्याचे नमूद केले होते. मात्र यावर बीसीसीआयने संजीव गुप्ता यांना चांगलेच फटकारले.
याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयसोबत बोलताना सांगितले की, “अशा प्रकारची तक्रार करण्याला काहीही अर्थ नाही. कारण संघाची निवड आता झालेली आहे. तो केवळ खेळाडूंना आपल्या अनुभवाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच टी-२० विश्वचषक स्पर्धा आयपीएलनंतर खेळवली जाणार आहे. त्यामुळे कोणालाही हे माहित नाही, की धोनी सीएसकेसाठी पुढच्या हंगामात खेळणार की नाही.”
“आपल्या सर्वांना हे माहीत आहे की, जेव्हापासून नव्या नियमांना लागू करण्यात आले आहे. तेव्हापासून अशा प्रकारच्या तक्रारी नेहमी येत राहतात. यामागे केवळ लोकप्रियता मिळवणे आणि विनाकारण वाद करण्याचा हेतू असतो.”
“टी-२० विश्वचषक स्पर्धा आयपीएलनंतर खेळवली जाणार आहे. यातील पुढच्या हंगामात २ नवीन संघ देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे अनेक खेळाडूंना एका मोठ्या लिलाव प्रक्रियेला सामोरे जायचे आहे. ज्यामुळे यंदाच्या हंगामानंतर सर्व खेळाडूंना करार मुक्त (रिलीज) करण्यात येणार आहे. त्यामुळे हे कोणालाही माहीत नाही की धोनी पुढच्या हंगामात खेळणार आहे की नाही,” असेही अधिकारी म्हणाला.
‘गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीला ग्राह्य धरले, तर कोहलीला देखील आयपीएल खेळता येणार नाही’
याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने गुप्ता यांना फटकारले. हा अधिकारी म्हणाला की, भारतीय संघाची निवड झालेली आहे आणि मार्गदर्शकाचा संघाच्या निवड प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप नसणार आहे. तो केवळ संघाला मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहे संघासाठी धोनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. तो एक वरिष्ठ खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा खेळाडूंना नक्की होऊ शकतो. तसेच केलेल्या तक्रारीवर तर्क लावून विचार केल्यास विराट कोहलीला देखील आयपीएलमध्ये खेळण्यात बंदी आणावी लागेल.
तसेच बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना म्हटले की, या गोष्टी अशा स्तरावर पोहोचू लागल्या आहेत, की ज्यानुसार भारताचे माजी क्रिकेटपटू आपल्या देशाची सेवा करू शकत नाहीत.
महत्वाच्या बातम्या –
–“बुमराहने मला डेल स्टेनची आठवण करून दिली”, केविन पीटरसन का म्हणाला असं, वाचा सविस्तर
–Video: भारतीय मूळच्या अमेरिकन फलंदाजाने केली कमाल! गिब्सनंतर वनडेत ठोकले सलग ६ षटकार
–ओव्हल कसोटीचा हिरो ठरलेला बुमराह अखेरच्या सामन्यात होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण