आयपीएल 2024 चा हंगाम सुरू झाला असून या स्पर्धेत आतापर्यंत 13 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आयपीएलमध्ये सहभागी सर्व 10 फ्रँचायझींच्या मालकांची बैठक बोलावली आहे. 16 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये ही बैठक होईल. याच दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीसाठी सर्व 10 टीमच्या मालकांना निमंत्रण पाठवण्यात आलंय. संघ मालकांसह त्यांचे सीईओ आणि ऑपरेशनल टीम देखील या बैठकीला उपस्थित राहू शकतात. या महत्त्वाच्या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंह धुमल हेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचं निमंत्रण आयपीएलचे सीईओ हेमांग अमीन यांनी पाठवलं असल्याचं समजतं.
हेमांग यांनी निमंत्रणपत्रिकेत बैठकीचा अजेंडा स्पष्ट केलेला नाही, मात्र अचानक बोलावलेल्या बैठकीकडे पाहता, पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयनं लिलावाच्या धोरणांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी बैठक बोलवली असू शकते. सूत्रांनुसार, बैठकीत आयपीएलला पुढे कसं न्यायचं यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत चर्चा होऊ शकते. या संदर्भात आयपीएल फ्रँचायझींची वेगवेगळी मतं आहेत. किती खेळाडूंना कायम ठेवायचे यावर फ्रँचायझींचं एकमत नाही. बीसीसीआय या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मध्यम मार्ग काढेल असा विश्वास आहे.
काही आयपीएल फ्रँचायझी मालकांचं मत आहे की खेळाडूंचा रिटेन्शन नंबर वाढवायला हवा. यासाठी ते युक्तिवाद करतात की, फ्रँचायझींना स्वतःचा ब्रँड आणि चाहता वर्ग मजबूत करण्यासाठी सातत्याची आवश्यकता असते. काही फ्रँचायझी असं सुचवतात की, खेळाडूंची राखीव संख्या आठ पर्यंत वाढवावी. मात्र, काही जणांचा याला विरोधही आहे.
पगारवाढीसंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा होऊ शकते. हा असा विषय आहे ज्यावर नेहमीच वाद होतात. बीसीसीआयनंही याबाबत ठोस भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी झालेल्या मिनी लिलावात पगाराची मर्यादा 100 कोटी रुपये होती, मात्र आता ती वाढेल असा विश्वास आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, भाजपात प्रवेश करणार?