आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी आपल्या स्फोटक खेळीने लक्ष वेधणाऱ्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा भारताच्या टी२० संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी (६ जून) युरोप दौरा आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा टी२० संघ जाहीर केला. यामध्ये वैभवचा समावेश असून त्याला लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या प्रचंड यश आणि प्रसिद्धीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफसोबत दोन विशेष व्यक्ती प्रवास करणार आहेत.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघात निवड झालेल्या वैभवसाठी अचानक मिळालेली प्रसिद्धी, माध्यमांचे लक्ष आणि वरिष्ठ संघाचा प्रचंड दबाव हाताळणे हे आव्हानात्मक ठरू शकते. यामुळे बीसीसीआयने इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत वैभवचे आई-वडिल प्रवास करतील, असा निर्णय घेतला आहे. विदेशी दौऱ्यावर त्याच्या पालकांच्या उपस्थितीमुळे वैभवला एकटेपणा जाणवणार नाही आणि त्याला घरासारखे वातावरण मिळेल. तसेच त्याला नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात मदत होईल.
जेव्हा सचिन तेंडुलकर १९८९ मध्ये भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी पाकिस्तानला गेला होता, तेव्हा त्याचा मोठा भाऊ अजित त्याच्यासोबत गेला होता. त्यावेळी सचिन केवळ १६ वर्षांचा होता. आता बीसीसीआयने वैभवच्या बाबतीतही हा निर्णय घेतला आहे. मंडळाचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, “तो एक लहान मुलगा आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या आई-वडिलांना त्याच्यासोबत आयर्लंड आणि इंग्लंडला प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बीसीसीआय त्यांचा सर्व खर्च उचलेल.”
बीसीसीआयने अलीकडेच विदेशी दौऱ्यासाठी काही कडक नियम केले होते, ज्यामध्ये खेळाडू संपूर्ण दौऱ्यात आपल्या कुटुंबाला किंवा जोडीदाराला सोबत ठेवू शकत नाही. जर एखाली मालिका किंवा स्पर्धा ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ असली तर खेळाडूंचे कुटुंब केवळ १४ दिवसच सोबत राहू शकतात. हाच नियम बीसीसीआयने वैभवसाठी थोडाला बदलला आहे.
वैभवची निवड होताच त्याने विक्रम केला. तो भारतीय संघात निवड झालेला सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला. त्याची वयाच्या १५ वर्षे आणि ७१ दिवसांतच संघात निवड झाली आहे. सचिनची वयाच्या १६ वर्षे आणि १९४ दिवसांत संघात निवड झाली होती. त्याने आपल्या पहिल्याच दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. जर वैभवला निवड झालेल्या दौऱ्यात अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरूण भारतीय क्रिकेटपटू ठरेल.






