भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी (२० जून) होणार आहे. या सामन्यापूर्वी, बीसीसआयने (BCCI) संघात वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा समावेश करून एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, राणा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात सामील झाला आहे.
मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. गुरनूर ब्रारने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रभावी गोलंदाजी केली, तर दुसऱ्या सामन्यात प्रिन्स यादवलाही संधी देण्यात आली होती. सध्या अर्शदीप सिंग भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करत आहे.
बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पुरुष निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ एकदिवसीय सामन्यासाठी हर्षित राणाची भारतीय संघात निवड केली आहे. बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (COE) मधील पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राणा चेन्नईमध्ये भारतीय संघासोबत जोडला गेला आहे.”
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा.
दरम्यान, दुखापतींमुळे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या या मालिकेत खेळू शकलेले नाहीत. हे दोन्ही वरिष्ठ खेळाडू इंग्लंड दौऱ्यादरम्यान पुनरागमन करतील अशी अपेक्षा आहे.
हर्षित राणाचे आगमन भारताची वेगवान गोलंदाजी फळी अधिक मजबूत करेल. दुसरीकडे, कर्णधार गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. त्याने दोन सामन्यांत सर्वाधिक २३८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये मागील सामन्यातील १५४ धावांच्या शानदार खेळीचा समावेश आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
हा सामना रोहित शर्मासाठीही महत्त्वाचा ठरेल. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यानंतर, अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्याचे त्याचे ध्येय असेल.






