भारताचे दोन संघ सध्या वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असून त्यांना ऑगस्ट महिन्यापासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तर दुसरा संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. दरम्यान इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातील ३ क्रिकेटपटूंना दुखापत झाल्याने ते आगामी कसोटी मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.
बीसीसीआयने सोमवारी (२६ जुलै) दुखापग्रस्त वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान आणि शुबमन गिल संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर झाले असल्याचे घोषणा केली आहे. तसेच निवड समितीने त्यांच्याजागी श्रीलंकेतील सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांना इंग्लंडला पाठवण्यास परवागनी दिली असल्याचेही सांगितले आहे.
वॉशिंग्टन, आवेश आणि शुबमनच्या दुखापतीविषयी अपडेट
अष्टपैलू वॉशिंग्टन याने आपल्या उजव्या हाताच्या जखम झालेल्या बोटावर इंजेक्शन घेतले आहे. परंतु त्याला या दुखापतीतून बरे होण्यासाठी बराच अवधी लागू शकतो. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. कसोटी मालिकेपुर्वी भारत विरुद्ध काउंटी सिलेक्ट इलेव्हन यांच्यात पार पडलेल्या सराव सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करतेवेळी त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.
याचदरम्यान भारतीय कसोटी संघाचा राखीव खेळाडू आणि वेगवान गोलंदाज आवेश खान याच्याही डाव्या हाताच्या अंगठा जखमी झाला होता. आता त्याच्या अंगठ्याचा एक्स रे काढम्यात आला आहे. यामध्ये त्याचा अंगठा फ्रॅक्चर असल्याचे आढळले आहे. त्यामुळे सुंदरबरोबर आवेशही इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेला मुकणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
सराव सामन्यादरम्यान काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाचे काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्याने वॉशिंग्टन आणि आवेशला त्यांच्या संघात सहभागी करण्यात आले होते.
तत्पुर्वी भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्यानंतर दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली असल्याने तोदेखील भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नसेल. तो मायदेशी अर्थात भारतात परतला आहे.
सूर्यकुमार आणि पृथ्वी जाणार इंग्लंड वारीला
अशाप्रकारे एकूण ३ भारतीय खेळाडू इंग्लंडशी दोन हात करण्यास अनुपलब्ध असतील. त्यामुळे बीसीसीआयने निवड समितीकडे त्यांच्याजागी काही पर्यायी खेळाडूंची मागणी केली होती. निवड समितीने त्यांच्या मागणीला हिरवा झेंडा दाखवत पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. परंतु सध्या श्रीलंकेत असलेले हे खेळाडू इंग्लंडला कधी आणि कसे रवाना होतील, हे अद्याप अस्पष्ट आहे.
भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृध्दिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव
राखीव खेळाडूः प्रशांत कृष्णा, अरझान नागवासवाला
महत्त्वाच्या बातम्या-
संजूला बाद करण्यासाठी श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकाची ‘चिटिंग’! मग फलंदाजाने शिकवला चांगलाच धडा
शांत स्वभावाचा द्रविडही भारतीय संघातील ‘त्या’ खेळाडूचा चुकिचा फटका पाहून असा वैतागला
विकेट मिळताच गोलंदाजाची कॉमेंट्री बॉक्समध्ये धाव, हुंकार भरत केलं हटके सेलिब्रेशन; बघा व्हिडिओ