भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांमध्ये लवकरच मोठा बदल होऊ शकतो. कसोटीत टीम इंडियाच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संपूर्ण स्टाफ दबावात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सीतांशू कोटक यांच्याकडे सोपवू शकते. सीतांशू यांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. ते सध्या इंडिया अ संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्यांना ही जबाबदारी मिळू शकते.
‘टाईम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, बीसीसीआय कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआय सीतांशू कोटक यांना वरिष्ठ संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनवू शकते. गौतम गंभीर सध्या मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर बीसीसीआयनं नुकतीच एक आढावा बैठक घेतली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
सितांशू कोटकची क्रिकेट कारकीर्द चांगली राहिली आहे. निवृत्तीनंतर ते पूर्णवेळ प्रशिक्षक बनले. ते सौराष्ट्राचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. यानंतर ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सामील झाले. येथे त्यांनी फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली. सीतांशू यांची मेहनत पाहून बीसीसीआयनं त्यांना इंडिया अ संघाचं मुख्य प्रशिक्षक बनवलं. तो गेल्या चार वर्षांपासून भारत अ संघासोबत आहेत. मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर सीतांशूनं बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते 2017 मध्ये आयपीएल संघ गुजरात लायन्सचे सहाय्यक प्रशिक्षक होते.
वृत्तानुसार, बीसीसीआय सीतांशू यांच्या नावाचा गांभीर्यानं विचार करत आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्यांना फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी दिली जाऊ शकते. परंतु अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. जर आपण भारताच्या सध्याच्या कोचिंग स्टाफवर नजर टाकली, तर गौतम गंभीर हे मुख्य प्रशिक्षक आहेत. तर रायन डोचेट आणि अभिषेक नायर हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. मॉर्ने मॉर्केल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
हेही वाचा –
कोण बनणार भारताचा पुढील बॅटिंग कोच? सेहवागसह या माजी खेळाडूंचे नावं चर्चेत
इंग्लंडच्या माजी खेळाडूला व्हायचंय भारताचा बॅटिंग कोच, टीम इंडियाविरुद्ध ठोकल्या आहे खोऱ्यानं धावा
“मी खूप भाग्यवान आहे की…”, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज हिटमॅनचा मोठा चाहता