येत्या २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद रोहित शर्माच्या हाती देण्यात आले आहे.
हा दौरा भारतीय संघातील काही खेळाडूंसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे, जर या दौऱ्यावर भारतीय संघातील काही फलंदाज साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. तर त्यांना भारतीय संघातून कायमचे स्थान गमवावे लागू शकते. चला तर पाहूया कोण आहेत ते खेळाडू.
अजिंक्य रहाणे – भारतीय संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याचे उपकर्णधारपद काढून घेऊन ही जबाबदारी रोहित शर्माला देण्यात आली आहे.
गेल्या २ वर्षांपासून फलंदाज म्हणून अजिंक्य रहाणे पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने शेवटचे शतक ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झळकावले होते. जर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर साजेशी कामगिरी करता आली नाही, तर हा त्याचा शेवटचा दौरा ठरू शकतो.
चेतेश्वर पुजारा – भारतीय कसोटी संघातील मुख्य फलंदाज चेतेश्वर पुजारा देखील फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करतोय. त्याला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत मोठी खेळी करता आली नाही. २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याला एकही शतक झळकावता आले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे तो जर दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या मालिकेत फ्लॉप ठरला, तर ही मालिका त्याच्यासाठी शेवटची मालिका ठरू शकते.
ईशांत शर्मा – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हा संघातील सर्वात वरिष्ठ गोलंदाज आहे. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी देण्यात आली होती. परंतु, त्याला एकही गडी बाद करता आली नाही. त्याच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जास्त धावा केल्या. त्यामुळे त्याच्यासाठी देखील जर कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर दक्षिण आफ्रिका दौरा अखेरचा दौरा ठरू शकतो.
दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन
न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाने १-० ने विजय मिळवला होता. या मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. ज्यामध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश होता. आता हे खेळाडू दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या मालिकेत पुनरागमन करणार आहेत.
असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या :
मातब्बर गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमधून बाहेर झाली विराटची पत्नी अनुष्का शर्मा, पण का?
कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा एजाज आयपीएल खेळण्याबाबत म्हणाला असं काही, वाचा