पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज सईद अजमलने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) टीका केली आहे. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे ही गोष्ट जगजाहीर आहे. अजमलने याच विषयाला अनुसरून, बीसीसीआयकडे भरपूर पैसा आहे व पैसाच सर्वकाही असतो, अस म्हटले आहे. आयसीसीने अजमलच्या फिरकी गोलंदाजी ‘दुसरा’ वर त्याच्या कारकिर्दीच्या काळात बंदी घातली होती. अजमलने याबाबतही भाष्य करताना बीसीसीआयला यासाठी जबाबदार धरले आहे.
अश्विन अजूनही खेळत आहे
अजमलने बीसीसीआयवर टीका करताना भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या नावाचाही उल्लेख केला आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने अजमलच्या हवाल्याने सांगितले आहे की, “आयसीसीने भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला माझ्यावर चार्ज लावण्यापूर्वी सहा महिन्यांसाठी गोलंदाजीपासून रोखले होते. अश्विनला सहा महिन्यांसाठी आराम करण्यास सागितले गेले होते. मला आणि मोहम्मद हफीजला बाजूला केले गेले.”
“भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि गोलंदाज हरभजन सिंगच्या गोलंदाजीमध्येही समस्या होती. पण ते भारतातून येतात आणि त्यांच्या बोर्डकडे पैसा आणि स्पॉन्सर्स आहेत आणि पैसाच सर्वत वर असतो. या खेळाडूंना कसल्याही प्रकारच्या विवादाचा सामना करावा लागत नाही,” असेही अजमल म्हटला आहे.
पंतप्रधानांनी केले होते भाष्य
यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांनीही बीसीसीआयविषयी मोठे विधान केले होते. इम्रान खान म्हणाले होते की, “पैसा बोलतो आणि बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. त्यामुळे ते विश्व क्रिकेटला नियंत्रित करतात. इंग्लंडने मागच्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता, पण भारताविरुद्ध असे करण्याची हिंमत त्यांच्यात नाही.”
विश्वचषकात भारत-पाकिस्तान आमनेसामने
दरम्यान, १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये बीसीसीआयच्या नियोजनात टी२० विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि भारत हे कट्टर विरोधी संघांना विश्वचषकासाठी एकाच गटामध्ये ठेवले गेले आहेत. दोन्ही देश त्यांच्या विश्वचषकातील अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. हा सामना २४ ऑक्टोबरला खेळला जाईल.






