इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात येणार आहेत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. मात्र, यासाठी आता बीसीसीआयसमोर अनेक आव्हाने असणार आहेत. त्यातील एक आव्हान म्हणजे कॅरेबियन प्रीमीयर लीगमधील अखेरचे काही सामने सप्टेंबरच्या मध्यात होणार आहेत. त्यामुळे दोन्ही स्पर्धेत एकाचवेळी खेळाडूंना खेळता येणार नाही.
या समस्येचे निराकरण करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न सुरु असून ते वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी चर्चा करत असल्याचे समजत आहे. कदाचीत सीपीएल ही स्पर्धा काही दिवस लवकर संपवली जाऊ शकते.
सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे सीपीएलला २८ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून ही स्पर्धा १९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. तर आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम १९ किंवा २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
या समस्येबद्दल बीसीसीआयच्या सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवरुन पीटीआयला सांगितले की ‘आमची क्रिकेट वेस्ट इंडिजबरोबर चर्चा सुरु आहे आणि आम्हाला आशा आहे की सीपीएल काही दिवस लवकर संपले तर यामुळे खेळाडूंना एका बायोबबलमधून दुसऱ्या बायोबबलमध्ये हलवण्यासाठी मदत होईल. त्यामुळे खेळाडू योग्यवेळी दुबईत पोहचून तिथे ३ दिवस अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करु शकतील.’
जर सीपीएलच्या वेळापत्रकात काहीही बदल झाला नाही तर कदाचीत काही खेळाडूंना आयपीएल २०२१ च्या पुनरागमनानंतर पहिल्या काही सामन्यांना मुकावे लागू शकते. सीपीएलमध्ये वेस्ट इंडिजचे कायरन पोलार्ड, ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, निकोलस पूरन, फॅबियन ऍलेन, किमो पॉल, सुनील नारायण असे काही दिग्गज खेळाडू खेळणार आहेत, जे आयपीएलचाही भाग आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराह की बोल्ट? कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापूर्वी दिग्गजाने सांगितला सर्वोत्तम गोलंदाज
साऊथम्पटनच्या एकाच हॉटेलमध्ये पुरुष संघासह महिला संघ राहणार विलगीकरणात, ‘हे’ आहे कारण
खूप साऱ्या भाज्या ते डोसा, ‘रनमशीन’ विराट कोहलीचा कसा असतो डाएट, घ्या जाणून