आशिया चषक २०२२ मधील आपला पहिला सामना भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धा पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना दुबईत २८ ऑगस्टला रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने युएईत सरावाला सुरुवातही केली आहे. यादरम्यान भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून जोडला गेलेला वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाल्याचे वृत्त पुढे आले होते. आता बीसीसीआयने याबद्दल नेमके सत्य काय आहे?, हे सांगितले आहे.
काही तासांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे व अनकॅप्ड वेगवान गोलंदाज कुलदीप सेन हा त्याची जागा घेणार आहे.
चाहरने दुखापतीमुळे ६ महिन्यांनंतर झिम्बाब्वे दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन केले होते. परंतु या दौऱ्यात तो ३ पैकी दोनच सामन्यात खेळला होता. यानंतर चाहर पुन्हा एकदा दुखापतीमुळे आगामी आशिया चषकातून बाहेर होऊ शकतो, असे सांगितले जात होते. त्याचा रिप्लेसमेंट म्हणून आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) प्रतिनिधित्त्व करणारा अनकॅप्ड खेळाडू कुलदीप सेन (Kuldeep Sen) याला निवडण्यात आल्याचे म्हटले जात होते.
काय आहे सत्य?
परंतु आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सत्य सांगितले आहे. ते म्हणाले की, “दीपक चाहरला दुखापत झालेली नाही आणि तो अजूनही संघासोबत आहे. दुबईत झालेल्या संघाच्या सराव सत्राचही तो सहभागी झाला आहे. तर कुलदीप सेनला भारतीय संघामध्ये नेट बॉलर म्हणून बोलावण्यात आले आहे. चाहर हा भारतीय संघाचा राखीव गोलंदाज आहे आणि त्यामुळेच तो भारतीय संघाबरोबर कायम आहे. त्यामुळे त्याला दुखापत झाली हे वृत्त खरे नाही.”
दरम्यान कुलदीप सेनने आयपीएल २०२२ मधील त्याच्या प्रदर्शनाने प्रभावित केले होते. राजस्थानने त्याला ७ सामने खेळण्याची संधी दिली होती. या सामन्यांमध्ये त्याने ९.४२ च्या इकोनॉमी रेटने ८ विकेट्स घेतल्या होत्या.
IND-PAK सामन्याची क्रेझ! तब्बल १३२ देशांमध्ये एशिया कपचे लाईव्ह स्ट्रिमींग, भारतात ‘या’ चॅनेलवर पाहाल
नताशापासून धनश्रीपर्यंत, IND vs PAK सामन्याला ग्लॅमरचा तडका; दिसणार खेळाडूंच्या लाईफ पार्टनर
आशिया चषकापूर्वी धोनीच्या आठवणीत कोहली भावूक; म्हणाला, ‘७+१८, आमची भागीदारी…’