बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना आणि भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणच्या परदेशी लीगमध्ये खेळण्याला परवानगी देण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. रैनाने इरफानबरोबर केलेल्या इंस्टाग्राम लाइव्ह चॅटदरम्यान भारतीय खेळाडूंच्या परदेशी लीगमध्ये खेळण्याच्या विषयावर चर्चा केली होती. BCCI official responds to suresh raina’s overseas leagues participation point.
आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “जे खेळाडू निवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहेत. ते खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळण्याच्या विषयावर चर्चा करत असल्यास, ते ठीक आहे. पण तरीही आमचा प्रयत्न असेल की त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंनी लीगच्या बाबतीत इंडियन प्रिमीयर लीगपर्यंत मर्यादित रहावे. तसेच करार नसणाऱ्या खेळाडूंनाही आयपीएलमध्ये चांगली रक्कम मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नशील असू.”
“या खेळाडूंच्या भविष्याचा विचार करता त्यांनी या गोष्टीचा विचार करणे चुकीचे नाही. पण तरीही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
इरफानसोबतच्या इंस्टाग्राम लाइव्ह चॅटदरम्यान रैना म्हणाला होता, “मला वाटते की बीसीसीआय, आयसीसी आणि फ्रंचायझींनी मिळून काही तरी नियोजन करावे. जेणेकरुन करार नसलेले खेळाडू परदेशी टी२० लीगमध्ये सहभागी होऊ शकतील. त्याने सध्या कोणताही करार नसलेल्या खेळाडूंचे उदाहरण देत, यूसुफ पठाण आणि रॉबिन उथप्पा यांचे नाव सांगितले होते. कमीत कमी खेळाडूंना २ लीगमध्ये तरी खेळण्याची अनुमती द्यावी, असे रैनाने म्हटले होते.”
इरफाननेही याबाबत प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “प्रत्येक देशातील परिस्थिती वेगळी आहे. मायकल हसीने ऑस्ट्रेलिया संघात २९ वर्षाच्या वयात पदार्पण केले होते. पण, भारतीय संघात कोणताही खेळाडू ३० वर्षांच्या वयात पदार्पण करू शकत नाही. जर कोणत्या भारतीय खेळाडूचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तो भारतीय संघाकडून खेळण्याची शक्यता नसेल. तर, त्याला परदेशी लीगमध्ये तरी खेळण्याची परवानगी द्यायला हवी.”
विशेष म्हणजे, भारतीय खेळाडूंना आयपीएल व्यतिरिक्त जगातील कोणत्याही टी२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली जात नाही. बीसीसीआय यासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देत नाही. पण, जर खेळाडू निवृत्त झाला असेल तर त्याला एनओसी मिळू शकते.
युवराज सिंग आणि झहीर खान यांना क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ग्लोबल कॅनडा टी२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
जेव्हा सुरेश रैना बोलतो मराठीत, रोहितही देतो मराठीत उत्तर
अव्वल स्थानावर तर टीम इंडिया हवी होती; ऑस्ट्रेलिया कशी, महान…
दादाच्या या निर्णयामुळे गंभीर बनला बीसीसीआयचा चाहता; म्हणाला…