भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध 22 नोव्हेंबरपासून कोलकातामधील इडन गार्डन(Eden Gardens)स्टेडीयमवर आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना(Day-Night Test)खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात गुलाबी चेंडूचा (pink balls) वापर करण्यात येणार आहे.
त्यादृष्टीने विचार करता बीसीसीआयने(BCCI)या सामन्यासाठी 72 गुलाबी चेंडू तयार करण्यास सांगितले आहे. ज्यामुळे दोन्ही संघ सामन्याआधी गुलाबी चेंडूसह सरावही करु शकतात.
तसेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे की या सामन्यासाठी एसजी कंपनीचा गुलाबी चेंडू वापरण्यात येणार आहे.
गुलाबी चेंडू तयार करण्याबद्दल एसजीचे विक्री आणि विपणन संचालक पारस आनंद म्हणाले, ‘बीसीसीआयने सहा डझन गुलाबी चेंडू मागवले आहेत आणि आम्ही ते पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत पोहचवू. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत आम्ही लाल एसजी चेंडूंमध्ये बरीच सुधारणा केली होती आणि आम्ही गुलाबी चेंडूसाठीही तेवढ्याच स्तरावरील संशोधन केले आहे.’
याआधी भारतात दुलीप ट्रॉफी स्पर्धेत तीन मोसमात कुकाबूराच्या गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आला होता. पण त्यानंतर बीसीसीआयने मागीलवर्षी पुन्हा लाल चेंडू वापरात आणला.
याबरोबर पारस यांनी असेही सांगितले की लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडूवर अधिक धूळ बसते. पण त्याचबरोबर ते असेही म्हणाले की जर आम्ही लाल चेंडूत सुधारणा करु शकतो तर आम्ही गुलाबी चेंडूतही सुधारणा करु.
या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 ते 10 नोव्हेंबर दरम्यान 3 सामन्यांची टी20 मालिका होईल. त्यानंतर 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना इंदोरला पार पडले.






