बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील मतभेद मागच्या वर्षी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जगासमोर आले होते. यानंतर या दोघांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे सांगितली जात होते. पण आता शुक्रवारी (४ मार्च) भारत आणि श्रीलंका संघातील मोहालीमध्ये खेळला जाणारा पहिला कसोटी सामना (IND vs SL, Mohali Test) सुरू होण्यापूर्वी गांगुली यांनी विराटचे तोंड भरून कौतुक केले आहे. विराटसाठी हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी गांगुली यांनी विराटचे कौतुक केले आणि त्या दोघांमध्ये सर्वाकाही ठीक असल्याचे संकेतही दिले आहेत. गांगुली म्हणाले की, “१०० कसोटी सामने खेळण्यासाठी त्याला खूप चांगला खेळाडू असावे लागते. भारतीय क्रिकेटमधील खूप कमी लोक इथपर्यंत पोहोचू शकले आहेत. हे एक अप्रतिम यश आहे. विराट महान खेळाडू आहे आणि तो यासाठी पूर्णपणे पात्र आहे.”
“त्याची पद्धत, त्याची सकारत्मकता, त्याचा फुटवर्क, त्याचे संतुलन… मला त्याच्यातील त्या सर्व गोष्टी आवडतात. या सगळ्यापेक्षा त्याने २०१४ नंतर स्वतःच्या खेळात जो बदल आणला, जेव्हा तो इंग्लंडसोबत संघर्ष करत होता. मी ती कसोटी मालिका पाहिली होती, कारण तेव्हा मी तिथे समालोचकाची भूमिका पार पाडत होतो. त्यानंतर पुढचे पाच वर्ष त्याच्यासाठी खूप अप्रतिम राहिले होते.” असे गांगुली पुढे बोलताना म्हणाले.
विराट मागच्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून आंतरराष्ट्रीय शतकाच्या प्रतिक्षेत आहे. २०१९ नंतर त्याला एकही शतकी खेळी करता आलेली नाही. याविषयी बोलताना गांगुली म्हणाले की, “असे होणे सामन्य गोष्ट आहे. मी २००२ ते २००५ दरम्यान राहुल द्रविडसोबत असेच होताना पाहिले आहे. जेव्हा महान खेळाडू यशाच्या शिखरावर असतो, त्यानंतर त्यांच्यासमोर खराब काळही येत असतो. सचिन (तेंडुलकर) सोबतही असे झाले होते.”
दरम्यान, मागच्या वर्षी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतले होते. बीसीसीआय अध्यक्षांनी याविषयी बोलताना सांगितले होते की, बोर्ड मर्यादित षटकांचे कर्णधारपद एकाच खेळाडूकडे ठेवण्याचा विचार करत आहे आणि त्यामुळेच रोहितवर ही जबाबदारी सोपवली गेली. गांगुली यांनी असेही सांगितले होते की, त्यांनी स्वतः तसेच इतरही अधिकाऱ्यांनी विराट टी-२० कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला दिला होता. पण विराटने त्यांचे ऐकले नाही.
परंतु दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटने घेतलेल्या पत्रकार परिषदेत असा खुलासा केला होता की, टी-२० संघाचे कर्णधारपद न सोडण्याविषयी त्याच्याशी कोणीच चर्चा केली नव्हती. तसेच एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्याआधीही त्याला कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती. या संपूर्ण प्रकारानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला आणि विराटनेही कसोटी कर्णधारपदही सोडले.
महत्वाच्या बातम्या –
‘जे खेळाडू आयपीएल खेळत नाही, त्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळत नाही’, भारतीय गोलंदाजची खंत
रोहित शर्मा ज्या मैदानात बनणार कसोटी कर्णधार, त्या मैदानाशी विराट कोहलीचे स्पेशल कनेक्शन
‘त्या’ भीषण घटनेची १३ वर्षे! आजच्याच दिवशी श्रीलंकन संघावर पाकिस्तानमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला