मुंबई । कोरोना विषाणूच्या सावटात जगभरातील अनेक देशांचे क्रिकेट संघ मैदानात परतले आहेत, तर भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू अद्याप मैदानात सराव करण्यासाठी परतलेले नाहीत. भारतातील कोरोना विषाणूचे वाढते प्रकरण पाहून बीसीसीआयने आधीच सांगितले होते की, ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण शिबिर उभारण्याचा विचार करू शकत नाही, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडीजचे संघ मैदानात परतले आहेत.
दरम्यान, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) भारतासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची तयारी करत असून ते भारताऐवजी दुबईमध्ये आयोजित करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनास कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेण्यापूर्वी खेळाडूंसाठी किमान 6 आठवड्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत, बीसीसीआयने ज्या खेळाडूंशी करार केला आहे अशा खेळाडूंसाठी दुबईमध्ये हे शिबिर आयोजित केले जाऊ शकते. इंग्रजी वृत्तपत्र न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय दुबईमध्ये भारतीय संघाचा सराव शिबिर आयोजित करू शकते.
महत्त्वाचे म्हणजे या अहवालानुसार बीसीसीआय आयपीएल 2020 चे आयोजन युएईकडे देण्याचा विचार करीत आहे, त्यामुळे स्पर्धेपूर्वी खेळाडूंनी योग्य सराव करावा अशी फ्रॅंचायझींची इच्छा आहे. बीसीसीआय सध्या टी 20 विश्वचषक स्थगित होण्याची प्रतीक्षा करीत आहे. जेणेकरुन ते या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करू शकेल.
ऑस्ट्रेलियाकडून आयोजित टी 20 विश्वचषक पुढे ढकलल्यास आयपीएल ऑक्टोबर-नोव्हेंबरच्यामध्ये आयोजित केले जाऊ शकते. यापूर्वी भारत अनेक मालिकां रद्द करू शकतो. यात इंग्लंडचा भारत दौरा आणि भारताचा ऑस्ट्रेलिया दौर्याचा समावेश आहे.
जर बीसीसीआयने असा प्रस्ताव ठेवला तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे बरेच नुकसान होऊ शकते. विशेष म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियात टी 20 लीग बिग बॅशचे आयोजनही केले जाणार आहे. भारत व ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड एकमेकांशी कसा ताळमेळ जुळतात हे केवळ वेळच सांगेल.