क्रिकेट जगतात अनेक मराठमोळ्या खेळाडूंनी आपले नाव कमावलेले आहे. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, एकनाथ सोलकर, सदू शिंदे, बापू नाडकर्णी, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, जहीर खान, अजिंक्य रहाणे यांसोबतच सध्याचा भारतीय संघातील प्रमुख खेळाडू केदार जाधव, शार्दुल ठाकूर हे त्यांचा वारसा पुढे नेत आहेत.
क्रिकेटमध्ये असे खेळाडू खेळताना दिसतात, ज्यांचे आडनाव सारखे असते. सिंग हे तर भारतीय संघातील सर्वात जास्त दिसणारे आडनाव. याचबरोबर काही मराठी आडनावही आहेत जी भारतीय संघात दिसतात.
या दरम्यानच, असे तीन खेळाडू आहेत ज्यांनी महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावात आढळणारे पाटील आडनाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावले आहे.
आज याच तीन पाटलांबद्दल आपण जाणून घेऊया.
१. सदाशिव पाटील
कोल्हापूरचे असलेले सदाशिव रावजी पाटील हे भारतीय क्रिकेट संघासाठी खेळणारे पहिले पाटील आडनावाचे खेळाडू होते. भारतासाठी त्यांनी अवघा एक कसोटी सामना खेळला मध्यमगती गोलंदाजसाठी पाटील हे प्रसिद्ध होते.
१९५५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ते आपला एकमेव सामना खेळले. या सामन्यात त्यांनी दोन बळी मिळवले होते. याच सामन्यात भारताचे माजी दिग्गज खेळाडू नरी कॉन्ट्रॅक्टर यांनीसुद्धा पदार्पण केले होते.
सदाशिव पाटील यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ३६ प्रथमश्रेणी सामन्यांत त्यांनी ८३ बळी मिळवले. १९५५ रणजी सत्रात त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व देखील केले.
२. संदीप पाटील
संदीप पाटील हे नाव सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या ओळखीचे आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेले मुंबईकर संदीप पाटील आपल्या स्टाइलिश फलंदाजीसाठी ओळखले जात.
पाटील यांनी २९ कसोटी सामन्यात ३६.९३ च्या सरासरीने १,५८८ धावा काढल्या. वनडेमध्ये ४५ सामन्यात १,००५ धावा आपल्या नावे केल्या. यामध्ये ९ अर्धशतकांचा समावेश होता.
निवृत्तीनंतर, संदीप पाटील यांनी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून हात आजमावले. त्यांनी केनिया संघाला २००३ च्या विश्वचषक उपांत्य फेरीपर्यंत नेण्याची किमया केली. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक तसेच राष्ट्रीय निवडसमितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले.
३. स्वप्नील पाटील
सदाशिव पाटील आणि संदीप पाटील यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाटील नाव नेणारा तिसरा खेळाडू म्हणजे स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील याने भारतीय संघ नाहीतर युएईच्या राष्ट्रीय संघातर्फे खेळत आपले नाव कमावले.
युवा असताना ठाणे येथे खेळत असलेला स्वप्निल कामानिमित्त आखाती देशात स्थायिक झाल्यानंतर युएई यासाठी क्रिकेट खेळू लागला. यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या या मराठमोळ्या खेळाडूने युएईचे २०१५ विश्वचषकात प्रतिनिधित्व देखील केले होते. तो युएईकडून आत्तापर्यंत १० एकदिवसीय सामने खेळलेला आहे.
स्वप्निल त्याच्या पदार्पणातच खेळलेल्या नाबाद ९९ धावांच्या खेळीसाठी ओळखला जातो.
वाचनीय लेख –
सीमारेषेच्या आत आहे क्रिकेट मैदानावर झाडं, यावर शतक मारल्यावर गांगुलीला झाली होती शिक्षा
वनडे, टी२०क्रिकेट गाजवलेले पण कसोटी क्रिकेट नशिबात नसलेले ४ क्रिकेटर
पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती






