सध्याच्या घडीला मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने हे चाहत्यांसाठी खूपच आकर्षक असले तरी पारंपारिक क्रिकेट स्वरूप म्हणजे कसोटी किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटला अजूनही उच्च दर्जाचे क्रिकेट मानले जाते. म्हणूनच बरेच खेळाडू अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये महान होण्याचे स्वप्न पाहतात.
पण असे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी मर्यादित षटकांच्या स्वरूपामध्ये फार मोठे यश संपादन केले आहे, परंतु तरीही त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही किंवा फक्त एक कसोटी सामना खेळला आहे.
जाणून घेऊया अशा ४ खेळाडूंबद्दल ज्यांनी मर्यादित षटकांच्या चांगली कामगिरी केली आहे, परंतू त्यांनी अजून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही किंवा फक्त एक कसोटी सामना खेळला आहे.
४. जेम्स फॉल्कनर (James Faulkner)
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जेम्स फॉल्कनर प्रभावी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने २०१२ मध्ये टी२० क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१३ मध्ये फॉकनरने वनडे आणि कसोटी सामन्यात पदार्पण केले. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत, त्याला काही तंदुरुस्तीच्या समस्यांचा सामना करावा लागला. तरीही त्याने वेगवान गोलंदाजीच्या जोरावर अविश्वसनीय कामगिरी केली आहे. मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनही त्याने यशस्वी खेळी केल्या. फॉल्कनर २०१७ पर्यंत ऑस्ट्रेलियाकडून खेळला आहे.
त्याने ६९ वनडे सामने आणि २४ टी-२० सामने खेळला आहे. परंतु तो त्याच्या कारकिर्दीत केवळ एकाच कसोटी सामन्यात खेळी शकला. हा सामना त्याने ऑगस्ट २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे खेळला आहे. या सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या. तसेच ४५ धावा केल्या.
त्याच्या वनडे कारकीर्दीत त्याने ९६ विकेट्स आणि टी२० मध्ये ३६ बळी घेतले आहेत. तसेच फलंदाज म्हणून फॉल्कनरने वनडे मध्ये १०३२ धावा (सरासर ३४.४०) आणि टी-२० मध्ये १५९ धावा (सरासरी १४.४५) केल्या आहेत.
३. आंद्रे रसेल (Andre Russell)
कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. विशेषत: टी२० क्रिकेटमध्ये त्याची लोकप्रियता खूप आहे. तो मधल्याफळीचा फलंदाज आणि वेगवान गोलंदाज म्हणून प्रभावी आहे.
२०१० मध्ये रसेलने श्रीलंकेविरूद्ध गॅले येथे कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. परंतु त्याची ही एकमेव कसोटी ठरली. त्या कसोटीत त्याने एका डावात २ धावा केल्या आणि १ विकेटही मिळवली.
२०११ मध्ये त्याने वनडेत आणि टी२० मध्ये पदार्पण केले. त्याने ५६ वनडे सामन्यात १०३४ धावा केल्या आहेत आणि ७० बळी घेतले आहेत. तसेच ४९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५४० धावा आणि २६ बळी मिळवले आहेत. गेल्या काही वर्षभरात रसेल टी-२० क्रिकेटमध्ये प्रभावी खेळ करत आहे.
२. डेव्हिड हसी (David Hussey)
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी हा दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक होता. त्याचा धाकटा भाऊ डेव्हिड हसी हा आक्रमक फलंदाज होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये डेव्हिड हसीने सर्वांना प्रभावित केले, परंतु तो कधीही कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकला नाही.
२००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले. डेव्हिड हसीने २०१३ पर्यंत ६९ वनडे सामने आणि ३९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले. त्याने वनडेत ३२.६५ च्या सरासरीने १७९६ धावा आणि टी२० मध्ये २२.९० च्या सरासरीने ७५६ धावा केल्या. तसेच ऑफ स्पिनर म्हणून डेव्हिडने वनडेमध्ये १८ विकेट्स तर टी२० मध्ये १९ बळी घेतले.
फलंदाजीत सातत्य नसल्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला.
त्याचबरोबर १९३ प्रथम श्रेणी सामन्यात ५२.२६ च्या उत्तम सरासरीने १४३२० धावा केल्या आहेत. पण प्रथम श्रेणीमध्ये अविश्वसनीय कामगिरीनंतरही कसोटी क्रिकेटसाठी डेव्हिडची कधीच निवड झाली नाही.
१. कायरन पोलार्ड (Kieron Pollard)
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. सध्या तो वेस्ट इंडिज संघातील अनुभवी खेळाडू आहे आणि वनडे आणि टी२० संघाचे नेतृत्व करीत आहे.
२००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या पदार्पणानंतर पोलार्डने फलंदाजी करताना ११३ वनडे सामन्यात २६.०० च्या सरासरीने २४९६ धावा आणि ७३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २३.३९ च्या सरासरीने ११२३ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत पोलार्डने वनडेमध्ये ५३ बळी आणि टी२० मध्ये ३५ बळी घेतले आहेत.
त्याने आता १४ वनडे आणि ११ टी२० सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्वही केले आहे.
२००७-२०१५ या दरम्यानच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत पोलार्डने १५१ सामन्यांत ३७.७१ च्या सरासरीने १५८४ धावा केल्या आणि १४ विकेट्स घेतल्या आहेत. परंतू त्याला कधीही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही.
वाचनीय लेख –
४ असे स्फोटक फलंदाज जे वनडे सामन्यात ठोकू शकतात त्रिशतक…
हे खेळाडू भविष्यात बनू शकतात या ७ संघांचे कर्णधार
पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती