१९७१ साली सुरु झालेल्या वनडे क्रिकेटने क्रिकेट जगताला वेगाशी ओळख करुन दिली. त्यानंतर अनेक खेळाडूंनी मोठ-मोठ्या खेळी वनडेत वेगाने केल्या. जिथे शतकही कठीण वाटत होते, तिथे आता खेळाडूंनी दिडशतके-द्विशतके करण्यापर्यंत मजल मारली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात ८ पुरुष तर २ महिला खेळाडूंनी द्विशतकी खेळी केली आहे.
पण वनडेमध्ये तिहेरी शतक ठोकता येईल का? याचा जर विचार केला तर सध्या जागतिक क्रिकेटमध्ये असे काही स्फोटक फलंदाज आहेत जे वनडेमध्ये तिहेरी शतके करण्यास सक्षम आहेत.
या लेखात अशा ४ स्फोटक फलंदाजांबद्दल आपण जाणून घेऊ जे वनडे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकण्यास सक्षम आहेत.
हे ४ खेळाडू वनडे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकू शकतात…
४- मार्टिन गप्टिल (Martin Guptill)
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू मार्टिन गप्टिल वनडे क्रिकेटमध्ये तिहेरी शतके करण्यास सक्षम आहे. गप्टिलने वनडे क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. त्याने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत खेळलेल्या १८३ सामन्यात ४२.२४ च्या सरासरीने ६८४३ धावा केल्या आहेत.
त्याने आपल्या फलंदाजीद्वारे १६ शतके आणि एक दुहेरी शतक देखील झळकावले आहे. गप्टिलची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या २३७ आहे.
वनडेमध्ये जर, सलामीवीर गप्टिल २३७ धावा करू शकतो तर संधी मिळाल्यास तिहेरी शतकी खेळी साकारू शकतो.
३. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock)
गेल्या काही वर्षांत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक हा शानदार खेळत आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने वनडे क्रिकेटमध्ये आपला चांगला खेळ करत संघाला अनेकदा विजय मिळवून दिले आहेत.
आतापर्यंत क्विंटन डी कॉकने १२१ वनडे सामन्यांमध्ये ४४.६५ च्या सरासरीने ५१३५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने आपल्या फलंदाजीने १५ शतके केली आहेत. डी कॉकची सर्वोत्तम खेळी १७८ धावांची आहे. डी कॉकचा फॉर्म शानदार आहे. असाच जर तो खेळत राहिला तर त्याच्यात तिहेरी शतक झळकाविण्याची क्षमता आहे.
२. डेव्हिड वॉर्नर (David Warner)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याच्या स्पोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने चेंडू छेडछाड प्रकरणाबद्दल आलेली बंदी संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. पुनरागमनानंरत त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली. कसोटी असो किंवा वनडे किंवा टी२०, तो प्रत्येक प्रकारामध्ये आपल्या संघासाठी धावा करत आहे.
पाकिस्तानबरोबर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नरने नाबाद ३३५ धावांची खेळी करत आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले तिहेरी शतक झळकावले होते. सध्या वॉर्नर हा ज्या विस्फोटक फॉर्म मध्ये आहे हे पाहून, संधी मिळेल त्या दिवशी तो वनडेतही तिहेरी शतक करू शकतो.
वॉर्नरने १२३ वनडे सामन्यात ४५.८० च्या सरासरीने ५२६७ धावा केल्या आहेत. १७९ ही वॉर्नरची वनडे मधील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
१. रोहित शर्मा (Rohit Sharma)
भारताच्या वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा विश्व क्रिकेटमध्ये ‘हिटमॅन ‘ म्हणून ओळखला जातो. वनडे क्रिकेटमध्ये रोहितने आक्रमक फलंदाजी करत आपले नाव कमावले आहे. रोहितने वनडेमध्ये ३ वेळा दुहेरी शतक ठोकले आहे.
रोहितने वनडे क्रिकेटमध्ये २०९ (ऑस्ट्रेलिया), २०८ (श्रीलंका), २६४ (श्रीलंका) असे द्विशतकीय खेळी साकारल्या आहेत. रोहित जेव्हा जेव्हा मैदानावर येतो तेव्हा त्याच्या चाहत्यांना दुहेरी शतकाची अपेक्षा असते.
वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक २६४ धावांचा विक्रम रोहितच्याच नावावर आहे. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये तिहेरी शतकाबद्दल विचार केला तर रोहितचे नाव प्रत्येकाच्या मनात येईल. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या २२४ वनडे सामन्यांत ४९.२७ च्या सरासरीने ३ द्विशतक आणि २९ शतकांच्या मदतीने ९११५ धावा केल्या आहेत.
वाचनीय लेख –
पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती
‘सर’ पदवी मिळालेले ५ दिग्गज क्रिकेटपटू
या ३ मैदानात आहेत सीमारेषेच्या आत झाड, ज्यामुळे बदलावे लागले क्रिकेटचे नियम