कोणताही खेळ असो त्या खेळामध्ये कर्णधारपदाची भूमिका खूप महत्वाची असते. क्रिकेटही असा एक खेळ आहे, ज्यामध्ये एक कर्णधार त्याच्या सोबतच्या १० खेळाडूंचे नेतृत्व करतो. अशा परिस्थितीत कर्णधाराची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढते. कोणत्याही कर्णधाराच्या नेतृत्त्वाचा प्रभाव संघावर पडत असतो.
क्रिकेटमध्ये बर्याच वेळा असे पाहिले जाते की संघातील खेळाडूंना बरोबर घेऊन जाणाऱ्या आणि चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूकडे कर्णधारपद दिले जाते. जगातील टॉप 7 क्रिकेट संघांच्या कर्णधारांबद्दल आपल्याला माहिती आहे. पण त्या संघांचा पुढील कर्णधार कोण होऊ शकतो याचा विचार केला आहे का..?
तर आपण या लेखात क्रिकेटच्या टॉप 8 संघांच्या अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊ जे भविष्यात त्यांच्या संघाचे कर्णधार बनू शकतात.
टॉप -7 संघांच्या कर्णधारांचे पर्याय
१- श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) – भारत
एमएस धोनी (MS Dhoni) नंतर टीम इंडियाची कमान विराट कोहली (Virat Kohli) याच्या खांद्यावर देण्यात आली. जानेवारी २०१५ मध्ये कसोटी आणि २०१७ मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार म्हणून कोहलीची नियुक्ती करण्यात आली होती. पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराटऐवजी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधार करण्याची मागणी अनेकदा होत असते.
परंतु जर आपण भारतीय क्रिकेट संघाला तीनही स्वरूपात विराट नंतरचा कर्णधार म्हणून विचार केला, तर श्रेयस अय्यर याच नाव आपण घेऊ शकतो. त्याने भारतीय संघाच्या फलंदाजीतील चौथ्या क्रमांकाची समस्या सोडवली आहे.
तसेच अय्यरकडे कर्णधारपदाचा अनुभवही आहे. मधल्या फळीचा स्फोटक फलंदाज अय्यरला आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटलची कमान सोपविण्यात आली होती. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०१९ मध्ये ७ वर्षानंतर संघाला प्ले ऑफमध्ये जागा मिळवून दिली होती.
याशिवाय अय्यर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट संघाचे नेतृत्वही करतानाही दिसतो. तसेच तो सध्या केवळ २५ वर्षांचा असल्याने भविष्याच्या दृष्टीकोनाने विचार करायचा झाल्यास विराटनंतर तीन्ही प्रकारासाठी श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून चांगला पर्याय ठरेल.
२. बाबर आजम (Babar Azam) – पाकिस्तान
सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने युवा सलामीवीर बाबर आजमला पाकिस्तान संघाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाची जबाबदारी सोपविली आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेट संघाची कमान अझर अली (Azhar Ali) याच्या हातात आहे.
परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला तिन्ही प्रकारासाठी कर्णधार म्हणून बाबर आझम हा उत्तम पर्याय आहे . बाबर आजमने अल्पावधीतच जागतिक क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावले आहे. तिन्ही स्वरूपात बाबर आझम पाकिस्तान संघातील उत्तम खेळाडू आहे.
बाबरने आतापर्यंत २६ कसोटी सामन्यात १८५० धावा, ७४ वनडे सामन्यात ३३५९ धावा आणि ३८ टी-२० सामन्यात १४७१ धावा केल्या आहेत. इतकेच नाही तर बबरने टी-२० आयसीसी क्रमवारीमध्ये बऱ्याच काळापासून क्रमांक १ वर कायम आहे.
३. बेन स्टोक्स (Ben Stokes) – इंग्लंड
इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार जो रूट (Joe Root) आणि मर्यादित षटकांचा कर्णधार ओएन मॉर्गन (Eoin Morgan) आहे. दोन्ही कर्णधार संघाचे नेतृत्व चांगले करत आहेत. एकीकडे मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने पहिला वनडे विश्वचषक जिंकला आहे, तर जो रूटनेही कसोटीचे नेतृत्तव चांगले सांभाळले आहे.
पण नंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दुसर्या कर्णधाराचा शोध घेतला, तर बेन स्टोक्स हा तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये इंग्लिश टीमचे नेतृत्व करू शकतो. इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आपल्या शानदार कामगिरीने संघाला अनेकदा विजय मिळवून दिले आहेत. तसेच तो संघातील नियमित खेळाडू देखील आहे.
त्याने नुकतेच वेस्ट इंडिज विरुद्ध साउथँम्पटनला झालेल्या कसोटी सामन्यात रुटच्या अनुपस्थितीत इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते. यावेळी त्याची कामगिरीही चांगली झाली. मात्र त्या सामन्यात इंग्लंडला पराभव स्विकारावा लागला.
४. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) -ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन (Tim Paine) आणि मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार अॅरोन फिंच (Aaron Finch) हे आहेत. पण जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढच्या कर्णधाराचा विचार केला तर स्टीव्ह स्मिथच्या रुपाने त्यांना एक चांगला पर्याय आहे.
स्मिथने याआधीच तिन्ही प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे, म्हणून जर त्याला पुन्हा संघाची कमान दिली तर त्याचा संघाला फायदा होऊ शकेल. २०१८ मधील चेंडू छेडछाडीच्या घटनेनंतर स्टीव्ह स्मिथवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती तसेच त्याच्या कर्णधारपदावरही बंदी घालण्यात आली होती.
पण आता तो सर्व बंदीतून मुक्त झाला आहे आणि आता त्याचा फॉर्मही विलक्षण आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथला कर्णधार म्हणून संधी देण्याचा विचार करू शकेल.
५. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) -दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक देखील उत्तम कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे. फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) नंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे नियमित कर्णधारपद डी कॉककडेच सोपविले आहे.
पण सध्या दक्षिण आफ्रिकेने कसोटी कर्णधार म्हणून त्याची नेमणूक केलेली नाही. परंतु तो तीनही स्वरूपात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने डी कॉकच्या नेतृत्वात मालिका जिंकली नसली तरी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतीय संघालाही कडवे आव्हान देत संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडे सध्या तिन्ही फॉर्मेटसाठी त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार म्हणून दुसरा पर्याय नाही. फाफ डु प्लेसिसने कर्णधारपद सोडल्यानंतर डी कॉकला कसोटी कर्णधार बनवल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु डी कॉक अद्याप कसोटी संघाचा नियमित कर्णधार बनलेला नाही.
६. कुशल परेरा (Kusal Perera) -श्रीलंका
२०१५ पासून श्रीलंका क्रिकेट संघ एका चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहे. परंतु आतापर्यंत त्यांना असा कर्णधार सापडला नाही जो दीर्घकाळ संघाची कर्णधारपदाची जवाबदारी सांभाळेल आणि संघाला विजयात मदत करेल. सध्या वनडे आणि कसोटी सामन्यांमध्ये दिमुख करुणारत्ने (Dimuth Karunaratne) कर्णधार पद सांभाळत आहे. तर टी२०मध्ये लसिथ मलिंगा ही जबाबदारी सांभाळत होता.
परंतु काही काळानंतरचा विचार करता श्रीलंका क्रिकेट बोर्ड तिन्हीही स्वरूपात संघाचे नेतृत्व करु शकेल अशा कर्णधाराच्या शोधात असेल.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आता कर्णधारपदाचा पर्याय पाहिला तर कुशल परेरा योग्य पर्याय असेल. कसोटी क्रिकेटमधील मोठी खेळी खेळण्याचा विक्रम या तुफानी फलंदाजाच्या नावे आहे. २९ वर्षीय कुशलने गेल्या वर्षी श्रीलंकेच्या गॅले मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला स्वबळावर पराभूत केले.
७. शाई होप (Shai Hope) – वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज क्रिकेट संघासाठी पुढील कर्णधाराचा पर्याय म्हणून, स्फोटक फलंदाज शाई होप हा एक चांगला पर्याय आहे. वेस्ट इंडिजकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये होप उत्तम कामगिरी करत आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्याची बॅट शांत दिसली. परंतु तो जलद ३००० धावा करणारा वेस्ट इंडीजचा पहिला फलंदाज ठरला होता.
गेल्या वर्षी शाई होपच्या उत्तम फलंदाजीचे कौशल्य पाहायला मिळाले. सध्या विंडीज कसोटी संघाचे कर्णधार पद जेसन होल्डर (Jason Holder) याच्याकडे आहे आणि मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व किरोन पोलार्ड (Kieron Pollard) करत आहे. दोन्ही कर्णधार चांगली कामगिरी करत असले, तरी कर्णधार बदलण्याचा विचार जर बोर्डाने केला तर शाई होप हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.
वाचनीय लेख –
पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती
या ३ मैदानात आहेत सीमारेषेच्या आत झाड, ज्यामुळे बदलावे लागले क्रिकेटचे नियम
अशी गडबड झाली आणि दोन्ही संघ एकाच वेळी फिल्डींगला आले मैदानात